मुंबई :
स्टेट ट्रान्पोर्ट को -ऑफ बँक ह्या एसटी कर्मचाऱ्यांच्या बँकेत कोल्हापूर शाखेत निरीक्षक म्हणून काम करणारा राहुल पुजारी हा संशयित आरोपी कुणासाठी काम करत होता.त्या मागील खऱ्या सूत्रधाराचा शोध पोलिसांनी घेतला तर घबाड बाहेर येईल, असा आरोप महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केला आहे.
एसटी बँकेत होत असलेल्या बेकायदेशीर कर्मचारी भरती, संचालकांकडून होणारी उधळपट्टी व इतर सर्व कामकाजाबाबत सहकार आयुक्त व रिझर्व्ह बँकेकडे अनेकांनी वारंवार तक्रारी केल्या होत्या त्याची चौकशी होऊन तसा अहवाल बँकेच्या पदसिद्ध अध्यक्षांकडे दिला पण त्यांनी कारवाई केली नाही. परिणामी बँक आर्थिक अडचणींत सापडली असून सभासदांना या वर्षीचा लाभांश मिळालेला नाही. वेळेवर कर्ज मिळण्यात अडचणी आल्या आहेत. आता दररोज नव नवीन घोटाळे ऐकायला मिळत असून बँकेच्या पंढरपूर शाखेतील निलंबित केलेल्या बँक कर्मचाऱ्याचा विभागीय चौकशी अहवाल वरिष्ठांकडे तातडीने पाठविण्यासाठी १ लाख १० हजार रुपयांची लाच स्वीकारल्या प्रकरणी बँकेच्या कोल्हापूर शाखेचा निरीक्षक राहुल रमेश पुजारी, कोल्हापूर हा रंगेहाथ सापडला. पुणे लाचलुचपत प्रतिबंध विभागाने शनिवारी रात्री ही कारवाई केली. त्याबद्दल पोलिसांचे मनःपूर्वक अभिनंदन, पण पोलिसांनी हा तपास पुढे चालू ठेवून बँकेत करण्यात आलेली बेकायदेशीर भरती, निवृत्त कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या, बढत्या याबाबतीत झालेला गैर व्यवहार यांचा शोध घेतला पाहिजे. या शिवाय बँकेच्या अनियमित कर्मचाऱ्यांवर अवाजवी लाखो रुपयांची खैरात केली जात आहे. बँकेत नियम डावलून भरती केली असून तात्पुरत्या स्वरूपात घेतलेल्या हंगामी कामगारांना ५० हजार रुपये बोनस बेकायदेशीररित्या दिला गेला आहे. जे कर्मचारी अधिकृत नाहीत. ज्यांच्या कामाचे स्वरूप तात्पुरते आहे. त्यांना बोनस दिला आहे. ती रक्कम त्यांच्या कडून पुन्हा परत घेऊन कुणालातरी देण्यात आली आहे. कुठल्याही संस्थेत बोनस वर्षभर काम केल्या नंतर दिला जातो ,पण इथे मात्र ज्यांनी गेल्या आर्थिक वर्षात एक महिना काम केले आहे, अशा तात्पुरत्या स्वरूपात कामावर घेतलेल्या कर्मचाऱ्याना बोनस देण्यात आला आहे. या शिवाय बँक आर्थिक अडचणींत असताना ७५ हजार रुपये इतकी रक्कम प्रोत्साहन भत्ता म्हणून दिली असून त्यातही घोटाळा झाला आहे. सदरची रक्कम ही तात्पुरत्या स्वरूपात काम करीत असलेल्या कर्मचाऱ्यांना देण्यात आली असून ती रक्कम सुद्धा त्यांच्याकडून परत घेऊन कुणालातरी देण्यात आली आहे. या मागील गौड बंगाल काय आहे याचा तपास पोलिसांनी करावा. असेही बरगे यांनी म्हटले आहे.