शिक्षण

मुंबई विद्यापीठातील विद्यार्थ्यांना अमेरिकेतील विद्यापीठात शिक्षणाची संधी

मुंबई : 

उच्च शिक्षणाच्या आंतरराष्ट्रीयकरणाच्या दिशेने मुंबई विद्यापीठाने आघाडी घेत परदेशी विद्यापीठांसोबत सह पदवी, दुहेरी पदवी आणि ट्वीनिंग पदवीच्या शिक्षणासाठी करार केले आहेत. याच करारातील पुढील टप्पा म्हणून मुंबई विद्यापीठात येत्या शैक्षणिक वर्षापासून रसायनशास्त्र, मानसशास्त्रात आणि कंप्युटेशनल डेटा सायन्समध्ये सह पदवीचे (ज्वाईंट डिग्री) शिक्षण उपलब्ध करून दिले जाणार आहे. यासाठी मुंबई विद्यापीठाने अमेरिकेतील प्रतिष्ठित इंडियाना विद्यापीठासोबत शैक्षणिक सामंजस्यासाठी पुढाकार घेत मागील वर्षी इंडियाना विद्यापीठास भेट देऊन याविषयी चर्चा केली होती. त्याच अनुषंगाने आज इंडियाना विद्यापीठाच्या चांसलर आणि एक्झीक्युटीव्ह व्हाईस प्रेसिडेंट डॉ. लथा रामचंद यांच्यासह इतर मान्यवरांनी मुंबई विद्यापीठास भेट देऊन शैक्षणिक सामंजस्यासाठी स्वारस्य दाखवले.

डॉ. लथा रामचंद या मुंबई विद्यापीठाच्या अर्थशास्त्र विभागाच्या माजी विद्यार्थी असून प्रतिष्ठित इंडियाना विद्यापीठाचे नेतृत्व करीत आहेत. प्रारंभी चर्चेच्या अनुषंगाने दोन्ही विद्यापीठांनी रसायनशास्त्र, मानसशास्त्र आणि कंप्युटेशनल डेटा सायन्स या विषयात सह पदवीचे (ज्वाईंट डिग्री) शिक्षणासाठी स्वारस्य दाखविले. लवकरच दोन्ही विद्यापीठात शैक्षणिक सामंजस्य करार केला जाणार आहे. आज झालेल्या चर्चेच्या दरम्यान इंडियाना विद्यापीठाच्या शिष्टमंडळाच्या वतीने इंडियाना विद्यापीठाच्या चांसलर आणि एक्झीक्युटीव्ह व्हाईस प्रेसिडेंट डॉ. लथा रामचंद, असोशिएट व्हाईस चान्सलर, डॉ. हिलरी काह्न, असोशिएट डीन, डॉ. राजीव राजे व असिस्टंट डायरेक्टर प्रिया कुर्ले, आणि मुंबई विद्यापीठाच्या वतीने कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी, प्र.कुलगुरू, प्राचार्य डॉ. अजय भामरे, कुलसचिव डॉ. प्रसाद कारंडे, वाणिज्य व व्यवस्थापन शाखेचे अधिष्ठाता प्रा. रवींद्र बांबर्डेकर, मानव्य विज्ञान शाखेचे अधिष्ठाता प्रा. अनिल सिंग, आंतरविद्याशाखा अभ्यास शाखेचे अधिष्ठाता प्रा. अनिल कुमार सिंह, नवोपक्रम संचालक डॉ. सचिन लढ्ढा, मुंबई स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पब्लिक पॉलिसीच्या संचालिका प्रा. मनिषा करने, इतिहास विभागाच्या प्रा. मंजिरी कामत, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय साहचर्य व विद्यार्थी सहाय्य केंद्राचे समन्वयक डॉ. सुनील पाटील आणि नॅनो सायन्स आणि नॅनो टेक्नॉलॉजी विभागाचे संचालक प्रा. विश्वनाथ पाटील, आदी मान्यवर उपस्थित होते.

मुंबई विद्यापीठ आणि इंडियाना विद्यापीठात झालेल्या चर्चेच्या अनुषंगाने मुंबई विद्यापीठाने अग्रक्रमाने पदवी आणि पदव्युत्तर स्तरावरील दुहेरी आणि सह पदवीच्या शिक्षणासाठी व उद्योन्मुख क्षेत्रातील संधी आणि गरजा लक्षात घेऊन प्रगत संशोधनासाठी स्वारस्य दाखविले आहे. सह पदवीच्या शिक्षणाला प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांना तिसऱ्या आणि चौथ्या सत्राचे शिक्षण इंडियाना विद्यापीठात घेता येईल, त्याचबरोबर तेथील विद्यार्थ्यांना मुंबई विद्यापीठात तिसऱ्या आणि चौथ्या सत्राचे शिक्षण घेता येईल. आंतरराष्ट्रीय मान्यताप्राप्त विद्यापीठांच्या या सह पदवीच्या शिक्षणामुळे प्रत्येक संस्थेच्या सामर्थ्याचा आणि कौशल्याचा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उत्कृष्टता वृध्दीस हातभार लागणार असल्याचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी यांनी सांगितले. तसेच स्टडी अब्रॉड प्रोग्राम अंतर्गत विद्यार्थी विनिमयामुळे विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय वातावरणात उद्योन्मुख क्षेत्रातील विविध संशोधन पद्धती आणि प्रगत उपकरणांचा अभ्यास करता येईल. दोन्ही विद्यापीठातील संशोधकांना संयुक्त आणि सहयोगी प्रकल्पांवर एकत्रित काम करता येईल. त्याचबरोबर संशोधन सहयोगाअंतर्गत दोन्ही विद्यापीठातील पायाभूत व अनुषंगिक सुविधा, कौशल्य आणि आधुनिक उपकरणे आणि संसाधनाच्या एकत्रित वापरामुळे संशोधनातील संभाव्य परिणाम साध्य करता येऊ शकतील. या सहयोगी कार्यक्रमामुळे संशोधन प्रकाशने आणि संयुक्त प्रकाशनावरही काम करण्याची संधी मिळू शकणार असल्याचेही मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी यांनी सांगितले. ग्लोबल एज्युकेशन सिटीजनशिप आणि उच्च शिक्षणाच्या आंतरराष्ट्रीयकरणाच्या दृष्टिकोनातून मुंबई विद्यापीठ आणि इंडियाना विद्यापीठ यांच्यातील शैक्षणिक सामंजस्याचे महत्व अधोरेखित होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

डॉ. लथा रामचंद यांचे अर्थशास्त्रातील करिअर विषयावर व्याख्यान

अमेरिकेतील प्रतिष्ठीत इंडियाना विद्यापीठाच्या चांसलर आणि एक्झीक्युटीव्ह व्हाईस प्रेसिडेंट डॉ. लथा रामचंद यांचे आज मुंबई विद्यापीठाच्या कलिना संकुलातील ग्रीन टेक्नॉलॉजी सभागृहात अर्थशास्त्रातील करिअर विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. मुंबई विद्यापीठातील मुंबई स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पब्लिक पॉलिसी विभागातील आणि सलंग्नित महाविद्यालयातील सुमारे २५० विद्यार्थी या व्याख्यानासाठी हजर होते. व्याख्यानादरम्यान अर्थशास्त्र विषयाची व्याप्तीवर प्रकाश टाकत त्यांनी सूक्ष्म व स्थूल अर्थशास्त्र, गणितीय, कृषी आणि विकास अर्थशास्त्राच्या अभ्यास आणि संशोधनातील व्यापक संधीची उपलब्धता यावर माहिती दिली. अर्थतज्ज्ञ, आर्थिक जोखीम विश्लेषक, डेटा विश्लेषक, आर्थिक नियोजक व संशोधक, आणि गुंतवणूक विश्लेषक अशा विविध क्षेत्रात उत्तम करिअरच्या संधी उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच पदवी आणि पदव्युत्तर स्तरावरील विविध देशात अर्थशास्त्रातील अध्ययन आणि संशोधनासाठीचे विविध पर्याय विद्यार्थ्यांना सांगितले. प्रश्नोत्तराच्या अनुषंगाने अनेक विद्यार्थ्यांनी त्यांच्या शंकाचे समाधान केले. डॉ. लथा रामचंद या मुंबई विद्यापीठाच्या अर्थशास्त्र विभागाच्या माजी विद्यार्थी असून प्रतिष्ठित इंडियाना विद्यापीठाचे नेतृत्व करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *