क्रीडा

खो-खो विश्वचषक २०२५ : भारतीय महिला शतकी गुणांच्या हॅट्रिकसह गटात अव्वल

नवी दिल्ली :

इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियममध्ये सुरू असलेल्या खो-खो विश्वचषक २०२५ मध्ये भारतीय महिला संघांने शतकी गुणांच्या हॅट्रिकसह अ गटात अव्वल स्थान मिळवताना प्रत्येक सामन्यात गुणांची लयलूट केली. आजच्या मलेशिया विरुध्द झालेल्या सामन्यात भारताच्या संघाने पहिल्या डावात ६ तर दुसऱ्या डावात ४ ड्रीम रन मिळवत संघाला संरक्षणात सुध्दा मजबूत स्थिती मिळवून दिली. बचावपटू भिलार देवजीभाई आणि मोनिकाने त्यांच्या अप्रतिम ड्रीम रनने सामन्याची सुरुवात केली. मध्यंतराला भारताने ४४-०६ अशी ३८ गुणांची आघाडी घेत आपण पुन्हा एकदा गुणांची लयलूट करू असा जणू इशाराच दिला. गेल्या दोन सामन्यात भारताने १७५ व १०० गुण मिळवत एक आगळा वेगळा विश्वविक्रम केला होता. आज सुध्दा भारताने गुणांची शंभरी गाठत विजयासह शतकी गुणांची हॅट्रिक केली. भारताने हा सामना १००-२० असा ८० गुणांनी जिंकला.

या सामन्यात भारतीय संघाने सामन्याची सुरुवात बचावातील मजबूत कामगिरीसह केली. बचावपटू भिलार देवजीभाई (१.१५ मि. संरक्षण व ६ गुण), आणि मोनिकाच्या (३.२० मि. संरक्षण व ४ गुण), ड्रीम रनने सामन्याचा स्वरूप पालटवले. पहिल्या टर्नमध्ये ५ मिनिटे ५० सेकंद बचाव केल्यानंतर सामन्याचा पहिला डाव ६-६ अशा बरोबरीत संपला. त्यानंतर प्रियांका, नीतू आणि मीनू यांनी पहिल्या डावाच्या शेवटी शानदार कामगिरी करत संघाचा आत्मविश्वास वाढवला.

दुसऱ्या टर्नमध्ये खेळाच्या फक्त २७ व्या सेकंदाला मलेशियाच्या पहिल्या गटातील सर्व खेळाडूंना बाद करण्यात आले. यामुळे भारतीय संघाला मोठा आघाडी घेण्यासाठी संधी मिळाली. मोनिका आणि वझीर निर्मला भाटी (२.१६ मि. संरक्षण व २ गुण) यांनी आक्रमणात संघाला प्रचंड बळ दिले. मलेशियाच्या संघासाठी एंग झी यी आणि लक्षिता विजय यांनी संघाला प्रतिकाराची संधी मिळवून दिली. मलेशियाला ड्रीम रन साध्य करण्याची संधी मिळाली होती, पण 1 मिनिट 4 सेकंदांनी ते कमी पडले.

तिसऱ्या टर्नमध्ये सुभाष्री सिंगने भारतासाठी आणखी एक ड्रीम रन मिळवला. या डावात भारतीय संघाने ४ मिनिटे ४२ सेकंद शानदार संरक्षण केले व रेश्मा राठोड (१.१५ मि. संरक्षण व ६ गुण) यांनी दिलेल्या लढतीमुळे संघाने मोठी आघाडी घेतली. तिसऱ्या टर्ननंतर स्कोअर ४८-२० असा होता.

चौथा डावही भारतीय संघासाठी आक्रमण करताना तितकाच प्रभावी ठरला. सामन्यात पूर्ण वर्चस्व गाजवत भारतीय संघाने ८० गुणांच्या फरकाने मलेशियाला पराभूत केले.

तीन संघाचे समान गुण

महिलांच्या ब गटात इंग्लंड, केनिया व युगांडा या तिन्ही संघाचे समान गुण झाल्यामुळे यांच्यात गटातून प्रथम, द्वितीयसाठी बाद फेरीचा सामना खेळविण्यात येईल.

सामन्याचे पुरस्कार

  • सर्वोत्कृष्ट आक्रमक खेळाडू : एंग झी यी
  • सर्वोत्कृष्ट बचावपटू : मोनिका
  • सामन्याची उत्कृष्ट खेळाडू : रेश्मा राठोड

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *