मुंबई :
राज्य कामगार विमा सोसायटीच्या माध्यमातून कामगारांच्या वैद्यकीय सेवा पुरविली जाते. या कामगारांना उत्तम सुविधा मिळते का हे पाहण्यासाठी शुक्रवारी सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी अचानक वरळी कामगार रुग्णालयाला भेट देत पाहणी केली.
राज्यातील कामगारांना चांगल्या आरोग्य सुविधा मिळाव्यात, या उद्देशाने राज्य कामगार विमा महामंडळाने ईएसआयसी रूग्णालयांची निर्मिती केली आहे. या रूग्णालयांच्या माध्यमातून विमा काढलेल्या कामगारांना दर्जेदार आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी सार्वजनिक आरोग्य मंत्री आग्रही आहेत. परंतु या ठिकाणी सेवा सुविधा मिळण्यात अडचणी येत असल्याच्या बाबी निदर्शनास आल्या. त्यामुळे वरळी येथे मुख्य वर्दळीच्या भागातही सोसायटीच्या असलेल्या रुग्णालयाला आबिटकर यांनी शुक्रवारी अचानक भेट दिली. या भेटीमध्ये त्यांनी रुग्णालयाची पाहणी केली. तसेच हॉस्पिटलला आवश्यक असलेले सर्व सेवा सुविधा देण्याबाबत सरकार कटिबध्द असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. पाहणी केल्यानंतर दर्जेदार आरोग्य सुविधा देण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना त्यांनी निर्देशही दिले.