शहर

शहरी वाहतुकीसाठी एकात्मिक तिकीट प्रणाली – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई :

सार्वजनिक वाहतूक प्रणाली एका सिंगल मोबिलिटी प्लॅटफॉर्मवर आणण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न असून, त्यादृष्टीने मुंबईतील पायाभूत सुविधा विकसित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या उपक्रमामुळे प्रवाशांना केवळ ३०० ते ५०० मीटर चालून सार्वजनिक वाहतूक सुविधेचा लाभ घेता येईल. एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत जलद आणि सुलभ वाहतूक सेवा देण्याचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

मुख्यमंत्री श्री.फडणवीस आणि केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या उपस्थितीत मुंबईतील एकात्मिक तिकीट सेवा प्रणालीवर चर्चा झाली. या बैठकीत मित्रचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रविणसिंह परदेशी, मुख्यमंत्री कार्यालयाचे सचिव डॉ. श्रीकर परदेशी, तसेच मध्य, पश्चिम रेल्वे आणि महामुंबई मेट्रोचे अधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, मुंबईसाठी लोकल रेल्वे ही जीवनवाहिनी आहे. एकत्रिक सेवा प्रणालीमुळे प्रवाशांसाठी कनेक्टिव्हिटी जलद व सुलभ होणार असून, महसूल वाढीसह सार्वजनिक सेवांचा अधिकाधिक वापर होईल. तंत्रज्ञानाचा वापर वाढवून टॅक्सी आणि इतर सेवांसोबत या प्रणालीचे एकत्रिकरण करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी नमूद केले. या प्रकल्पामुळे प्रवाशांना सहजगत्या एकाच प्लॅटफॉर्मवर सर्व वाहतूक सुविधा मिळतील. यामुळे वाहतुकीचे सुलभीकरण होऊन प्रवाशांचा वेळ वाचणार आहे, तसेच वाहतूक व्यवस्थेतील अडथळे दूर होणार असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस सांगितले.

केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, मुंबईत सध्या ३,५०० लोकल सेवा कार्यरत आहेत. येत्या काळात आणखी ३०० लोकल सेवा सुरू करण्यासाठी १७, १०७ कोटी रुपयांची गुंतवणूक रेल्वेकडून करण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पांमध्ये १.७० लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे. केंद्र आणि राज्य सरकार मुंबईच्या सर्वांगीण विकासासाठी वचनबद्ध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

महाराष्ट्र सरकार शहरी वाहतुकीसाठी एकात्मिक तिकीट प्रणाली राबविण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलत आहे. महाराष्ट्र इंस्टीट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन (MITRA)च्या नेतृत्वाखालील या उपक्रमाचे उद्दिष्ट विविध सार्वजनिक वाहतूक सेवांसाठी तिकीट प्रक्रिया एकसंध व सुलभ करणे आहे. यासाठी ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्स (ONDC) प्लॅटफॉर्मचा तांत्रिक आधार घेतला जाणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *