नवी दिल्ली :
पहिल्या खो खो विश्वचषक स्पर्धेच्या यशस्वी समारोपानंतर, आंतरराष्ट्रीय खो-खो महासंघाचे अध्यक्ष सुधांशू मित्तल यांनी २०२७ साली दुसऱ्या विश्वचषक स्पर्धेचे यजमान पद इंग्लंडला दिल्याचे जाहीर केले. सदर स्पर्धा बर्मिंगहॅम, इंग्लंड येथे आयोजित करणार असल्याचे जाहीर केले.
भारतीय संघाने पुरुष आणि महिला या दोन्ही गटात विश्वविजेतेपद जिंकल्याने भारतभर जल्लोष होत आहे. पहिल्या विश्वचषक स्पर्धेच्या समारोपानंतर पत्रकार परिषदेत आयोजित केली होती. यावेळी आंतरराष्ट्रीय व भारतीय खो-खो महासंघाचे सरचिटणीस (तांत्रिक) एम. एस. त्यागी, आंतरराष्ट्रीय खो खो फेडरेशनचे सरचिटणीस रोहित हल्दानिया, इज माय ट्रिपचे वीरेंद्र कुमार, केकेडब्ल्यूसीचे सीईओ मेजर जनरल विक्रम देव डोग्रा आणि विश्वचषक विजेते संघाचे दोन्ही कर्णधार प्रतीक वाईकर आणि प्रियांका इंगळे उपस्थित होते.
केकेएफआयचे अध्यक्ष आणि सचिव यांच्याकडे ट्रॉफी सुपूर्द करताना कर्णधारांनी विजयाबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या. या स्पर्धेचे आयोजन करून खेळाला जागतिक स्तरावर पोहोचण्यास मदत केल्याबद्दल दोन्ही संघांचे प्रशिक्षक सुमित भाटिया, डॉ. मुन्नी जून (महिला संघ) आणि अश्वनी शर्मा (पुरुष संघ) महासंघाचे आभार मानले.
पत्रकारांना संबोधित करताना अध्यक्ष सुधांशू मित्तल म्हणाले, “ पहिली विश्वचषक खो-खो स्पर्धा खूप यशस्वी ठरली. पुढील खो खो विश्वचषक २०२६-२७ मध्ये बर्मिंगहॅम, इंग्लंड येथे होणार असल्याची घोषणा करताना आम्हाला आनंद होत आहे. दुसरी स्पर्धा पहिल्यापेक्षा मोठी आणि सर्व अपेक्षा पार करणारी व अधिक आनंद देणारी ठरेल.” ते पुढे म्हणाले, “आंतरराष्ट्रीय खो खो फेडरेशनचे पुढील अधिवेशन देखील १७ एप्रिल रोजी होणार आहे, ज्यात पुढील चार वर्षांच्या रणनीतीवर चर्चा केली जाईल आणि औपचारिकता ठरविली जाईल.”
पुढील खो खो विश्वचषक स्पर्धेचे ठिकाण जाहीर करताना श्री. मित्तल यांनी विश्वचषकाच्या यशाबद्दल विविध राजकारणी आणि मान्यवरांनी अभिनंदन केल्याचा खुलासाही केला. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जे.पी. नड्डा, रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी, उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक आणि केशव प्रसाद मौर्य, राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांचा समावेश असल्याचे सांगितले.