मुंबई :
पंजाब विद्यापीठ, चंदीगड येथे ९ ते १८ जानेवारी २०२५ दरम्यान आयोजित केलेल्या अखिल भारतीय आंतर विद्यापीठ महिला नेमबाजी स्पर्धेत मुंबई विद्यापीठाने उत्कृष्ट कामगिरी करत सुवर्णपदकाचा बहुमान मिळवला आहे. १० मीटर एअर रायफल महिला गटात मुंबई विद्यापीठाच्या मयुरी पवार या विद्यार्थींनीने ६५४ पैकी ६३३.१ गुण मिळवत सुवर्णपदक जिंकले. मद्रास विद्यापीठ आणि जम्मू येथील क्लस्टर विद्यापीठ यांना मागे टाकत मयुरींने १.३ गुणांनी विजेतेपद पटकावले. मयुरीच्या या सुवर्ण यशामुळे मुंबई विद्यापीठाचा क्रीडा क्षेत्रातील झेंडा उंचावला आहे.
अखिल भारतीय आंतर विद्यापीठ महिला नेमबाजी स्पर्धेत मुंबई विद्यापीठाकडून विविध गटांमध्ये १९ खेळाडूंनी भाग घेतला. प्रशिक्षक विजय वरळीकर आणि निशिगंधा किनळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली संघाचे नेतृत्व व्यवस्थापक शिवराज बेन्नूरकर यांनी केले. मयुरी पवार या विद्यार्थीनीच्या या विजयाबद्दल मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी, प्र-कुलगुरू प्राचार्य डॉ. अजय भामरे, कुलसचिव डॉ. प्रसाद कारंडे, क्रीडा संचालक डॉ. मनोज रेड्डी यांनी अभिनंदन करून भविष्यकालिन वाटचालीस शुभेच्छा दिल्या.