शहर

शिवाजी पार्कमधील धुळीमुळे होणारे प्रदूषण नियंत्रणासाठी उपाययोजना करणार

आयआयटी मुंबई येथील पर्यावरण तज्ज्ञांच्या शिफारशीनुसार बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून उपाययोजना

मुंबई : 

दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदान (शिवाजी पार्क) परिसरात धुळीमुळे होणारे प्रदूषण नियंत्रणात आणणे तसेच वायू गुणवत्ता वाढविण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून अल्पकालीन आणि दीर्घकालीन उपाययोजना अंमलात आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रोलरद्वारे मातीचा स्तर नियंत्रित करणे, धूळ नियंत्रणासाठी मातीवर सातत्याने पाणी फवारणी करणे यासारख्या अल्पकालीन उपाययोजना करण्यात येणार आहेत. तसेच परिसरातील वाऱ्याच्या वेगाचा सर्वंकष अभ्यास करुन त्यासंबंधी तोडगा काढणे आदींचा दीर्घकालीन उपाययोजनांमध्ये समावेश आहे.

भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) मुंबईतील पर्यावरण तज्ज्ञांनी केलेल्या शिफारशीनुसार महानगरपालिका प्रशासनाने तात्काळ कार्यवाही करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदान (शिवाजी पार्क) परिसरात मातीच्या धुलीकणांमुळे प्रदूषण होत असल्याची तक्रार स्थानिक रहिवाशांनी केली आहे. या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी अलीकडे मैदानात प्रत्यक्ष भेट दिली. प्रभावी निराकरण पद्धती अंमलात आणून प्रदूषण नियंत्रणात आणण्याचे निर्देश महानगरपालिका प्रशासनाला त्यांनी दिले होते.

त्या अनुषंगाने, याप्रकरणी दीर्घकालीन उपाययोजना करण्याच्या उद्देशाने बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून भारतीय तंत्रज्ञान संस्था (मुंबई) येथे कार्यरत पर्यावरण तज्ज्ञ प्रा. वीरेंद्र सेठी यांचा सल्ला घेण्यात आला. त्यांनी काही महत्वपूर्ण निरीक्षणे नोंदवत शिफारशी केल्या आहेत. यामध्ये अल्पकालीन आणि दीर्घकालीन अशा दोन प्रकारच्या उपाययोजनांचा समावेश आहे.

अल्पकालीन उपाययोजनांमध्ये धुलीकणांचे उत्सर्जन रोखण्यासाठी तसेच वायू प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी तातडीच्या तात्कालिक उपाययोजना करण्याचे सुचविण्यात आले आहे. यामध्ये प्रामुख्याने रोलर संयंत्राचा वापर करणे, धूळ नियंत्रणात ठेवून मैदानातील माती स्थिर ठेवण्यासाठी सातत्याने पाणी फवारणी करणे यांचा अंतर्भाव आहे. या उपाययोजनांची महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने तातडीने अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे.

दीर्घकालीन व्यापक उपाययोजनांमध्ये वाऱ्याच्या प्रवाह, इतर संबंधित घटकांचा तपशीलवार अभ्यास करणे आणि त्यावर प्रत्यक्ष कार्यवाही आधारित नियोजन करणे, आदींचा समावेश आहे. पर्यावरण तज्ज्ञांनी सुचविलेल्या या शिफारशींच्या अनुषंगाने वायू प्रदूषण कमी करण्यासाठी एक शाश्वत आणि सर्वसमावेशक उपाय विकसित करण्यासाठी महानगरपालिका कटिबद्ध असल्याचे महानगरपालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *