शहर

एसटीतील सुट्या पैशाच्या घोळाला प्राधिकरणातील अधिकारी जबाबदार – श्रीरंग बरगे

मुंबई : 

एसटीच्या भाडेवाढी संदर्भातील परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केलेले विधान हे काही अंशी खरे असून नवीन भाडेवाढ ही पाच रुपयांच्या पटीत असावी असा स्पष्ट प्रस्ताव एसटीने पाठवला असताना त्यात प्राधिकरणातील अधिकाऱ्यांनी आर्थिक नुकसान होण्याची भीती दाखवून अनपेक्षितपणे बदल करून एक रुपयाच्या पटीत भाडेवाढ करण्याचा आदेश काढला. त्यात सुट्या पैशाच्या बाबतीत काय करायचे याचा विचार झाला नाही. चलनात सुट्या पैशाचे व्यवहार जवळजवळ बंद झाले असताना हा निर्णय अनपेक्षितपणे लादला गेला असल्याची उपरोधीत टीका महाराष्ट्र एस.टी. कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केली आहे.

भाडेवाढीवर निर्णय घेण्याचे अधिकार राज्य परिवहन प्राधिकरणाला आहेत. परिवहन खात्याचे अपर मुख्य सचिव या प्राधिकरणाचे पदसिध्द अध्यक्ष राहिले आहेत. भाडेवाढी संदर्भात २५ जुलै २२ नंतर या प्राधिकरणाची बैठकच झालेली नाही. विशेष म्हणजे परिवहन विभागाचे अपर मुख्य सचिव आशिष कुमार सिंग व पराग जैन या दोघांच्या काळात एकही बैठक घेण्यात आली नाही. बैठकीविना ते अध्यक्ष पदावरून पायउतार झाले. साधारण २५ महिने बैठक न झाल्याने दरम्यानच्या काळात इंधन, स्पेअर पार्टस, वेगवेगळी बांधकामे व कर्मचाऱ्यांची वेतनवाढ झाल्याने एसटीचा तोटा वाढत गेला. वेळीच बैठक घेऊन भाडेवाढ केली असती तर तोट्याचे प्रमाण कमी करता आले असते. पण त्या पदाचा मान घेतला पण काम मात्र केले नाही. याला प्राधिकरणाचे बैठक न घेणारे अध्यक्ष जबाबदार असून झालेल्या तोट्याची रक्कम प्राधिकरणाच्या पदसिद्ध अध्यक्ष अधिकाऱ्यांकडून वसूल करण्यात यावी असेही बरगे यांनी म्हटले आहे.

मॅन्युअल तिकिटाचा प्रश्न अनुत्तरित

नव्याने भाडेवाढ करताना प्राधिकरणाच्या बैठकीत इलेक्ट्रोनिक तिकीट मशिन बंद पडले तर मॅन्युअल ट्रे वापरावा लागतो. अशा वेळी काय करायचे याचाही विचार करण्यात आलेला नसून आजमितीला फक्त ५/- रुपये व १०/-रुपये याच दराची प्रिंटिंग केलेली तिकीटे महामंडळाकडे उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे महामंडळाचा सर्वात मोठा प्रवासी वर्ग हा जास्तीत जास्त १ ते ६ स्टेज व १ ते ९ स्टेज पर्यंतचा प्रवास करताना दिसतो. त्याला अनुक्रमे ११ व १६ रुपये इतका तिकीट दर असून पाच व दहा रुपयांची तिकीट दिल्या नंतर वरील एक रुपयांचे तिकीट प्रिंटिंगच केले नसल्याने ते कुठून देणार? याचाही भाडेवाढ करतांना विचार केलेला नाही. त्यामुळे या सर्व प्रकाराला प्राधिकरण जबाबदार असून प्राधिकरणाची तात्काळ बैठक घेऊन नव्या भाडेवाढ सूत्रात सुट्या पैशाच्या व्यवहाराबाबतीत दुरुस्ती करण्यात येऊन सर्व बाबींचा विचार करूनच पुन्हा नव्याने भाडेवाढ करण्यात यावी असेही बरगे यांनी म्हटले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *