क्रीडा

श्री मावळी मंडळ खो-खो स्पर्धा : सह्याद्री, ओम साईश्वर, श्री समर्थ, राजर्षी शाहू महाराजची विजयी सलामी

ठाणे : 

महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या मान्यतेने व द अमॅच्युअर खो-खो असोसिएशन ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली श्री मावळी मंडळाने शतक महोत्सवी वर्षानिमित्त प्रथमच विभागीय (राज्यस्तरीय) पुरुष आणि महिलांचे भव्य खो-खो स्पर्धेचे आयोजन केले आहे. सदर स्पर्धा श्री मावळी मंडळाच्या क्रीडांगणात चरई, ठाणे (प.) येथे सुरु आहे. आज सकाळी ८:०० वाजता संस्थेचे अध्यक्ष सुधाकर मोरे यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन संपन्न झाले. त्यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष सुनील करंजकर, विश्वस्त सुर्वे, चिटणीस रमण गोरे, सदस्य मिलिंद यादव, महाराष्ट्र खो-खो असोसिएशन सहकार्यवाह व स्पर्धा निरीक्षक बाळासाहेब (बाळ) तोरसकर, द अमचुयर खो-खो असोसिएशन ऑफ ठाणेचे कमलाकर कोळी (उपाध्यक्ष), मंदार कोळी (चिटणीस), किशोर पाटील (पंच प्रमुख), इ. उपस्थित होते.

 

महिलांच्या उद्घाटनीय सामन्यात श्री सह्याद्री संघ, उपनगरने न्यू बॉम्बे हायस्कूल ठाण्याचा ९-८ असा ७.५० मि. राखून एक गुणाने विजय साजरा केला. या सामन्यात सह्याद्रीच्या तन्वी थेराडे (२.३०, १.५० मि. संरक्षण), लावण्या नावती (१.३०, २.३० मि. संरक्षण व ४ गुण), ग्रीष्मा माईन (नाबाद १.५०, १.४० मि. संरक्षण व ३ गुण), आर्या भाटकर (१.५०, १.३० मि. संरक्षण व १ गुण) यांनी विजय सुकर केला. तर पराभूत न्यू बॉम्बेच्या तानिया चौरसिया (२.२० मि. संरक्षण – पराभूत संघातील उत्कृष्ट खेळाडू पुरस्कार), दिशा दिघे (१.५० मि. संरक्षण व २ गुण) व कोमल राजभर (१.५० मि. संरक्षण) यांनी दिलेली लढत अपयशी ठरली.

महिलांच्या दुसऱ्या सामन्यात मुंबईच्या ओम साईश्वर सेवा मंडळाने ठाण्याच्या राज क्रीडा मंडळाचा ५-४ (मध्यंतर ५-२) असा एक डाव राखून एक गुणाने धुव्वा उडवला. या सामन्यात ओम साईश्वरच्या वैष्णवी परबने ३ मि. व ७.१० मि संरक्षण करून राज क्रीडा मंडळाच्या खेळाडूंवर मोठा दबाव निर्माण केल्याने त्यांना डावाने विजय साजरा करता आला. तिला इशाली आंब्रे (३.३० मि. संरक्षण) व अथश्री तेरवणकरने (नाबाद २.३०, १.४० मि. संरक्षण व १ गुण) यांनी मोलाची साथ दिल्याने हा मोठा विजय ओम साईश्वरला साजरा करता आला. तर पराभूत राज क्रीडाच्या दिक्षा सोनसुरकर (३.२० मि. संरक्षण व १ गुण), निधी जाधव (२.१० मि. संरक्षण व १ गुण) यांनी दिलेली लढत इतरांची चांगली साथ न मिळाल्याने पराभवाच्या गर्तेत गेली.

महिलांच्या तिसऱ्या सामन्यात मुंबईच्या श्री समर्थ व्या. मंदिरने यजमान ठाण्याच्या श्री मावळी मंडळाचा १४-१० (मध्यंतर ८-३) असा ४ गुणांनी पराभव केला. श्री समर्थच्या तन्वी मोरेने (३.३०, २.२० मि. संरक्षण व २ गुण) एकहाती विजयश्री खेचून आणली. तिला श्रीया नाईक (नाबाद २.२० मि. संरक्षण व ४ गुण), प्राजक्ता ढोबळे (१.३० , १.३० मि. संरक्षण व २ गुण) यांनी विजय सुकर केला. तर पराभूत मावळी मंडळाच्या सानिया मोरे (१.१०, २.३० मि. संरक्षण व ४ गुण), निधी सावंत (१.१०, २.३० मि. संरक्षण व ३ गुण), भावना देवासी (२.३० मि. संरक्षण) यांनी दिलेली कडवी लढत त्यांच्या संघाला विजय मिळवून देण्यात पुरेशी ठरली नाही.

आणखी एका महिलांच्या सामन्यात ठाण्याच्या राजर्षी शाहू महाराज संघाने द युनायटेड स्पो. क्लबचा १०-५ (मध्यंतर ६-१) असा ५ गुणांनी पराभव केला. या सामन्यात राजर्षीच्या मिना कांबळे (४.४० मि. संरक्षण व २ गुण), काजल शेख, साधना गायकवाड तर युनायटेडच्या सानवी तळवडेकर (३.४०, ६ मि. संरक्षण व १ गुण), परी पिंगळे यांनी चागला खेळ केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *