मुंबई :
खासगी कंपनीद्वारे सफाईगारांची पदे भरण्यात येऊ नये, बदली कर्मचाऱ्यांसाठी रिक्त जागा वगळून उर्वरित जागांवर सरळसेवेने पदभरती करावी या मागण्यांसाठी मुंबईतील जे.जे. रुग्णालय, सेंट जॉर्ज, कामा व आल्ब्लेस, जी.टी. रुग्णालय, नागरी स्वास्थ्य केंद्र (वांद्रे), पोद्दार आयुर्वेद रुग्णालय, शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयातील चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांनी सोमवारपासून बेमुदत उपोषण पुकारले आहे. याकडे दुर्लक्ष केल्यास कामबंद आंदोलन पुकारण्यात येईल, असा इशारा कर्मचाऱ्यांकडून देण्यात आला आहे.
वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाच्या अधिपत्याखाली मुंबईतील जे.जे रुग्णालय, सेंट जॉर्ज, कामा व आल्ब्लेस, जी.टी. रुग्णालय, नागरी स्वास्थ्य केंद्र (वांद्रे), पोद्दार आयुर्वेद रुग्णालय, शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयातील चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या महाराष्ट्र राज्य चतुर्थश्रेणी सरकारी कर्मचारी संघटनेने नुकतेच वैद्यकीय शिक्षण विभागाचे आयुक्त राजीव निवतकर यांची भेट घेतली. यावेळी झालेल्या बैठकीमध्ये संघटनेने बाह्यस्रोत्राद्वारे मे. स्मार्ट सर्व्हिसेस प्रा. लि. या संस्थेमार्फत भरण्यात येणारी सफाईगारांची पदे भरण्यात येऊ नये, तसेच ज्या रिक्त पदांवर बदली कर्मचारी काम करत आहेत, ती रिक्त पदे वगळून उर्वरित रिक्त पदांची भरती सरळसेवेने करण्यात यावी. त्याचबरोबर जे. जे. रुग्णालयातील पारिचारिकेने मारहाण केलेल्या कर्मचाऱ्याला न्याय मिळवण्यासाठी कर्मचाऱ्यांनी दोन दिवस केलेल्या आंदोलनावेळी कर्मचाऱ्यांचे वेतन कपात करण्यात आले हाेते. कपात केलेले वेतन परत अदा करावे, या मागण्यांवर चर्चा करण्यात आली. मात्र आयुक्त राजीव निवतकर यांच्याकडून सकारात्मक निर्णय घेण्यात न आल्याने महाराष्ट्र राज्य चतुर्थश्रेणी सरकारी कर्मचारी संघटनेअंतर्गत असलेल्या मुंबई जिल्हा चतुर्थश्रेणी कर्मचारी संघटनेच्या नेतृत्वाखाली मुंबईमधील सर्व वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालयातील चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांनी सोमवारपासून आझाद मैदानात बेमुदत साखळी उपोषण पुकारले आहे. या उपोषणाबाबतची सूचना वैद्यकीय शिक्षण संचालनालयाचे आयुक्तांना २८ जानेवारी २०२५ रोजी पत्राद्वारे देण्यात आली होती. मागण्या मान्य होईपर्यंत हे आंदोलन सुरू राहणार असून, याकडे सरकारकडून दुर्लक्ष करण्यात आल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, अशी माहिती मुंबई जिल्हा संघटनेचे सरचिटणीस पराग आडिवरेकर यांनी दिली.