डोंबिवली :
पूर्वेतील शिळफाटा रस्त्यावर रविवारी संध्याकाळी टाटा पॉवर समोरील परिसरात मोठ्या प्रमाणात मेंढ्यांच्या झुंजी खेळवल्या जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर टिळकनगर पोलिसांनी तिथे धाड टाकली. यावेळी उच्चशिक्षित तरुणांसह विविध क्षेत्रातील व्यावसायिक आणि नोकरदार नागरिक मेंढ्यांच्या झुंजीत सहभागी झाल्याचे आढळून आले. याप्रकरणी ३० जणांवर प्राण्यांना निर्दयतेने वागविण्यास प्रतिबंध करणाऱ्या कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून, १० जणांना पोलिसांनी ताब्यात घेऊन समजपत्र दिले आहे. उर्वरित ३० जण घटनास्थळावरून पळून गेले असून त्यांचा शोध सुरू आहे.
या प्रकरणात धक्कादायक बाब म्हणजे, डोंबिवलीतील या अवैध खेळात सहभागी होण्यासाठी पुण्यातील कोंढवा, तसेच मुंबईतील जोगेश्वरी, मालाड, वडाळा आणि अंधेरी भागातील उच्चशिक्षित तरुण, व्यावसायिक आणि नोकरदार येथे आले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यामध्ये एक अभियंता, मत्स्यशेती व्यवसाय करणारा व्यक्ती, कापड दुकानदार आणि एका विमान कंपनीचा सुरक्षा रक्षक देखील सहभागी होता. भारतीय नागरी सुरक्षा संहिता २०२३ चे कलम ३५(३) अन्वये या दहा जणांना नोटीस बजावण्यात आली आहे. तसेच, उर्वरित पळून गेलेल्यांविरुद्ध तपास सुरू आहे.
टिळकनगर पोलीस ठाण्यातील हवालदार विजेंद्र नवसारे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, रविवारी संध्याकाळी टाटा पॉवर समोरील मोकळ्या जागेत ३० जणांनी दोन मेंढ्यांच्या झुंजी आयोजित केल्या होत्या. या झुंजी दरम्यान, दोन्ही गटांनी आपल्या मेंढ्यांना जिंकण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन दिले. शासनाने मेंढ्यांच्या झुंजींवर बंदी घातली असतानाही हा खेळ सुरू असल्याने पोलिसांनी कारवाई केली. मेंढ्यांच्या झुंजींमध्ये प्राण्यांना मोठ्या प्रमाणात इजा होण्याची शक्यता असते. या प्रकारामुळे प्राणी सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. काही प्रकरणांमध्ये झुंजीदरम्यान मेंढ्यांचा मृत्यूही होऊ शकतो. त्यामुळे अशा स्पर्धांवर कठोर कारवाई करण्याची गरज असल्याचे प्राणीप्रेमी सांगत आहेत.
टिळकनगर पोलिसांनी या प्रकरणाचा अधिक तपास सुरू केला असून, पळून गेलेल्यांचा शोध घेतला जात आहे. भविष्यात असे प्रकार घडू नयेत म्हणून पोलीस सतर्क असून, अशा बेकायदेशीर झुंजी रोखण्यासाठी कठोर कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.