मुंबई :
माहीम ज्युवेनाईल स्पोर्ट्स क्लब व शिवाजी पार्क जिमखाना यांच्या संयुक्त विद्यमाने सुरु झालेल्या क्रिकेटपटू स्व. प्रकाश पुराणिक स्मृती चषक महिला टी-२० क्रिकेट स्पर्धेत जान्हवी काटे व मानसी पाटील यांच्या अष्टपैलू खेळामुळे फोर्ट यंगस्टर्स संघाने सुपर ओव्हरमध्ये गतउपविजेत्या राजावाडी क्रिकेट क्लबवर मात केली आणि उपांत्य फेरीत प्रवेश केला. शिवाजी पार्क येथील दुसऱ्या उपांत्यपूर्व सामन्यात दिलीप वेंगसरकर फाउंडेशनने साईनाथ स्पोर्ट्स क्लबचा ७ विकेटने पराभव केला. विजयी संघाच्या अष्टपैलू पूनम राऊत व मध्यमगती गोलंदाज जाई गवाणकर चमकल्या. सामन्यातील उत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार जान्हवी काटे व जाई गवाणकर यांनी पटकाविला.
राजावाडी क्लबने नाणेफेक जिंकून फोर्ट यंगस्टर्सला प्रथम फलंदाजी दिली. सलामी फलंदाज जान्हवी काटे (५६ चेंडूत ८६ धावा) व मानसी पाटील (३१ चेंडूत ३४ धावा) यांनी दुसऱ्या विकेटसाठी ८१ धावांची भागीदारी केल्यामुळे फोर्ट यंगस्टर्सने मर्यादित २० षटकात ४ बाद १६३ धावांचा पल्ला गाठला. विजयी लक्ष्याचा पाठलाग करताना सलामी फलंदाज अचल वळंजूने (३३ चेंडूत ४१ धावा) एक बाजू नेटाने लढवूनही १२ व्या षटकाला राजावाडी क्लबचा निम्मा संघ ७८ धावांत तंबूत परतला. अशी करामत मानसी पाटील (२९ धावांत ३ बळी) व हिमजा पाटील (२१ धावांत २ बळी) यांच्या फिरकी गोलंदाजीने केली. तरीही क्षमा पाटेकर (३१ चेंडूत नाबाद ६० धावा) व निविया आंब्रे (२७ चेंडूत नाबाद ३३ धावा) यांनी सहाव्या विकेटसाठी ४८ चेंडूत ८५ धावांची अभेद्य भागीदारी करून प्रतिस्पर्ध्यांच्या १६३ धावसंख्येशी बरोबरी केली.
परिणामी सामना सुपर ओव्हरमध्ये रंगला. मानसी पाटीलच्या ऑफ ब्रेक गोलंदाजीपुढे राजावाडी क्लबला ६ चेंडूत केवळ ८ धावाच काढता आल्या. जान्हवी काटेच्या (३ चेंडूत नाबाद ९ धावा) खणखणीत दोन चौकारामुळे ४ चेंडूत बिनबाद १० धावा फटकाविल्यामुळे फोर्ट यंगस्टर्सचा विजय सुकर झाला. दुसऱ्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात साईनाथ स्पोर्ट्स क्लबच्या डावाची सुरुवात जाई गवाणकर (२६ धावांत ४ बळी) व सिध्दी पवार (५ धावांत २ बळी) यांच्या अचूक मध्यमगती माऱ्यामुळे डळमळीत झाली. किंजल कुमारीने (४२ चेंडूत ४३ धावा) दमदार फलंदाजी करूनही साईनाथ क्लबला २० षटकात ८ बाद ११४ धावांपर्यंतच मजल मारता आली. दिलीप वेंगसरकर फाउंडेशनने १४ व्या षटकाला ३ बाद ११७ धावा नोंदवून विजयी लक्ष्य सहज गाठले. पूनम राऊतने ४३ चेंडूत नाबाद ४६ धावा फटकाविल्या.