
नांदेड :
महायुती सरकारने सुरु केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना, लाडका भाऊ योजना बंद होणार नाहीत, अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. नांदेड येथे शिवसेनेकडून आयोजित केलेल्या आभार सभेत ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, सचखंड म्हणजे सत्याची भूमी आणि येथे सत्याचाच विजय झाला. नांदेडी जिल्ह्यातील सर्वच ९ जागा महायुतीच्या जिंकून आल्या. हे यश लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, लाडके शेतकरी, लाडके ज्येष्ठ यांचे आहे. याच मैदानावर लाडक्या बहिणींचा मेळावा घेतला होता. हजारो बहिणी आशिर्वाद द्यायला आल्या होत्या. तुमच्या १५०० रुपयांच्या ओवाळणीमध्ये खोडा घालणाऱ्या सावत्र भावांना जोडा दाखवला नाही तर बहिणींनी जोरात वाजवला पण असे शिंदे म्हणाले. बहिणींनी एकच मारला पण सॉलिड मारला, सावत्र भाऊ दृष्ट भाऊ यांना चारीमुंड्या चित केलं. नांदेडकर जनतेने महायुतीला पैकीच्या पैकी मार्क, १०० टक्के रिझल्ट आणि १०० टक्के स्ट्राईक रेट राखला असे सांगत उपमुख्यमंत्री शिंदे यांनी मतदारांचे आभार मानले. बाळासाहेब सांगायचे की, खऱ्याला खरे म्हणा आणि सत्याची बाजू उचलून धरा. निवडून आल्यानंतर मतदारांचे आभार मानण्यासाठी इथे आवर्जून आलो, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
शिवसेना हा कार्यकर्त्याचा पक्ष असून इथ कोणी मालक आणि नोकर नाही. बाळासाहेब असताना कार्यकर्त्यांना सवंगडी म्हणायचे मात्र त्यांच्यानंतर काहीजण कार्यकर्त्यांना घरगडी समजत होते, अशी टीका त्यांनी उबाठावर केली. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे म्हणाले होते की, राजा का बेटा राजा नही बनेगा जो काम करेगा वही राजा बनेया असा आपला पक्ष आहे. आता शिवसेनेत कामाचे मेरिट चालते. बाळासाहेब आणि आनंद दिघे यांचे विचार घेऊन पुढे चाललोय असे ते म्हणाले. लोकसभेत उबाठापेक्षा आपल्याला २ लाख तर विधानसभेत १५ लाख जास्त मते मिळाली. बाळासाहेबांच्या विचारांचे खरे वारसदार आणि खरी शिवसेना कोण हे मतदारांनी निवडणुकीत दाखवून दिले. शिवसेना वाढत आहे आणि राज्यभरातून उबाठा आणि इतर पक्षातील लोक शिवसेनेत पक्ष प्रवेश घेत आहेत, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. यावेळी उबाठा पक्षाचे परभणी जिल्हा प्रमुख विशाल कदम शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला.
लोकहिताच्या योजना कोणतेही सरकार आले तरी बंद करता कामा नये मात्र महाविकास आघाडीने दुर्देवाने ते केले होते. महायुती सरकार आल्यानंतर मराठवाडा वॉटरग्रीड, जलयुक्त शिवार अशा योजना पुन्हा सुरु केल्या. मागील अडीच वर्षात सरकारने इतकं काम केले आहे की कार्यकर्ते ताठ मानेने जनतेसमोर जाऊ शकतात. सरकारी योजनांचा लाभ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवायचा आहे त्यासाठी कार्यकर्त्यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. ते म्हणाले की, गरिबीची जाण असल्यामुळेच आम्ही लाडकी बहिण योजनेचा निर्णय घेतला. मराठावाड्याची दुष्काळवाडा ही ओळख पुसायची आहे. महायुती सरकारने मराठवाडा वॉटरग्रीड योजनेला पुन्हा चालना देण्याचा निर्णय घेतला. जलयुक्त शिवार योजना सुरु केली. अडीच वर्षात शेतकऱ्यांच्या योजनांसाठी ४५००० कोटी रुपये दिले. शेतकरी सन्मान योजनेत वर्षाला १२००० रुपये दिले. एक रुपयात पीक विमा दिला, वीज बील माफ केले. त्यामुळेच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री पदापेक्षा लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ म्हणून मिळालेला हा बहुमान आणि ही ओळख सर्वात मोठी असल्याची भावना यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केली.
विधानसभा निवडणुकीत मतदारांनी महायुतीवर मतांचा वर्षाव केला. यामुळे राज्यातीलच नाही तर देशातील विश्लेषकांनी तोंडात बोट घातली. शिवसेनेचे चार आमदार नांदेडच्या विकासाचा चौकार मारतील, नांदेडचा चेहरामोहरा बदलतील, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. हळद संशोधन केंद्राचे काम लवकरच सुरु होणार आहे. एमआयडीसीचा प्रश्न सोडवणार आहे. पाण्याचा विषय, रस्त्याचे विषय मार्गी लावू, असे शिंदे म्हणाले. गाव तिथं शिवसेना, घर तिथं शिवसैनिक यामाध्यमातून पक्षाला पुढे जायचे आहे. लोकांचा शिवसेनेवर विश्वास आहे, कोरोना काळात शिवसैनिकांनी केलेले काम लोकांनी लक्षात ठेवला आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीचा विजय करण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, सदस्य नोंदणी सुरु ठेवावू, असे आवाहन उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केले