
मुंबई :
भारतात बालपणातील कर्करोगाची वाढ गंभीर समस्या बनत आहे, ज्यामधून बालपणातील कर्करोगाचा सामना करण्यासाठी आणि नियंत्रित करण्यासाठी समर्पित उपक्रम किंवा धोरणाचा अभाव दिसून येतो. भारतात सर्व कर्करोगांपैकी चार टक्के कर्करोग ० ते १४ वर्षे वयोगटातील मुलांमध्ये आहेत.
भारतात दरवर्षी जवळपास ५२,३६६ मुले (० ते १४ वर्षे) आणि ७६,८०५ मुले व किशोरवयीन (० ते १९ वर्षे) कर्करोगाने ग्रस्त होतात. पाश्चिमात्य देशांनी बालपणातील कर्करोगापासून वाचण्याच्या बाबतीत मोठी झेप घेतली आहे, पण भारत आणि इतर कमी-मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमध्ये (एलएमआयसी) अशी झेप दिसण्यात आलेली नसली तरी कर्करोगापासून वाचण्याच्या प्रमाणात काहीशी सुधारणा झाली आहे.
कर्करोग हा सर्वात प्राणघातक आजारांपैकी एक आहे, तरीही अनेकदा कर्करोगाचे उशिरा निदान होते. भीती, कलंक आणि जागरूकतेचा अभाव यामुळे अनेक व्यक्तींना वेळेवर वैद्यकीय साह्य मिळत नाही, ज्यामुळे कर्करोगापासून बचाव खडतर होऊन जाते. पण, उपचारांमधील प्रगती आणि लवकर निदानाच्या क्षमतेसह कर्करोगापासून वाचण्याची आशा अधिक प्रबळ झाली आहे.
संशोधकांनी बालपणातील कर्करोगाच्या कमी जोखीमेशी संबंधित घटक देखील ओळखले आहेत. उदाहरणार्थ, आईने फोलेटचे सेवन केल्याने मुलांमध्ये ल्युकेमिया आणि ब्रेन ट्यूमर या दोन्हींचा धोका कमी होतो. स्तनपान करणे आणि बालपणातील संसर्गांना सामोरे जाणे हे बालपणातील ल्युकेमिया होण्याच्या कमी जोखीमेशी संबंधित आहेत.
या लेखात, आपण कर्करोगाची धोक्याची लक्षणे, मुलांमधील कर्करोगाबद्दलची महत्त्वाची तथ्ये व आकडेवारी आणि जगण्याचे प्रमाण सुधारण्यासाठी लवकर निदानाचे महत्त्व जाणून घेऊ.
धोक्याची लक्षणे :
- अचानक वजन कमी होणे – योग्य आहार असूनही वजन कमी होणे किंवा भूक न लागल्यामुळे वजन कमी होणे.
- अस्पष्ट ताप – १०२ अंश फॅरेनहाइटपेक्षा जास्त तापमानाचा ताप, थंडी वाजून येणे, त्यानंतर रात्री घाम येणे किंवा दोन आठवड्यांपेक्षा जास्त काळ मध्यम ताप येणे.
- अस्पष्ट अस्वस्थता – अशक्तपणा आणि शारीरिक हालचालींचा अभाव यांसारख्या लक्षणांसह अचानक चिडचिड होणे.
- भूक न लागणे – भूक अचानक कमी होणे, तसेच वर नमूद केलेल्याप्रमाणे इतर लक्षणे आढळून आल्यास त्वरित पेडिएट्रिक ऑन्कोलॉजिस्टकडे जावे.
- अशक्तपणा – मूल अशक्त, कमकुवत आणि कुपोषित दिसते. तसेच, केस व त्वचेवर चमक नसते आणि गाल, ओठ, हाता-पायांचे तळवे पांढरे दिसतात. ही रक्ताशी संबंधित कर्करोगाची लक्षणे असू शकतात.
- जखम – किरकोळ दुखापतीमुळे मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होत असेल, मुलाच्या शरीरावर कोणत्याही दुखापतीशिवाय वारंवार जखमा होत असतील आणि वारंवार नाकातून रक्त येत असेल तर पालकांनी त्वरित पेडिएट्रिक ऑन्कोलॉजिस्टकडे जावे.
- वाढ आणि विकासात विलंब – पूर्णपणे सामान्य जन्माला आलेले मूल (सरासरी शरीराचे वजन, कोणताही रोग, आजार नसलेले) आणि योग्य वाढ होणारे मूल अचानक ऍक्टिव्हिटीजमध्ये आवड गमावू लागते आणि वाढ होण्यामध्ये विलंब होत असल्याचे दिसून येते.
- रोगप्रतिकारशक्ती कमी होणे – वारंवार संसर्ग, अनेक हॉस्पिटल्सना भेटी देणे, संसर्ग नियंत्रित झाल्यानंतर लक्षणे पुन्हा दिसणे.
- त्वचेतील बदल – त्वचेवर लाल ठिपके दिसणे (पेटेकिया)
बालपणातील कर्करोगाची सिलुआनची (Siluan’s) धोक्याची लक्षणे :
- S – सतत दिसून येणाऱ्या लक्षणांसाठी लवकर वैद्यकीय मदत घ्या.
- I – डोळ्यात पांढरे डाग, तिरकस नजरेने पाहणे, अचानक अंधत्व किंवा आयबॉल (नेत्रगोलक) फुगणे.
- L – पोट, ओटीपोट, डोके, हात, पाय, अंडकोष किंवा ग्रंथींवर गाठ येणे.
- U – दोन आठवड्यांपेक्षा जास्त काळ अस्पष्ट ताप, वजन कमी होणे, थकवा, अशक्तपणा, सहज जखम होणे आणि रक्तस्त्राव.
- A – हाडे, सांधे, पाठ दुखणे आणि सहज फ्रॅक्चर.
- N – न्यूरोलॉजिकल लक्षणे, चालणे, संतुलन किंवा बोलण्यात बदल, उलट्या आणि डोक्याचा आकार वाढण्यासह सतत डोकेदुखी.
निष्कर्ष :
मुलांमध्ये अस्पष्टरित्या वजन कमी होणे, सतत वेदना, असामान्य गाठी, दीर्घकाळ ताप व वर्तनातील बदल अशी कर्करोगाची लक्षणे लवकर ओळखणे वेळेवर निदान आणि उपचारांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. पोषण कमतरता देखील रोगप्रतिकारशक्ती कमकुवत करू शकते, ज्यामुळे कर्करोग होण्याचा धोका वाढतो. बालपणातील कर्करोग हा जागतिक आरोग्यासाठी मोठे आव्हान आहे, जो बालपणानंतर आजारामुळे होणाऱ्या मृत्यूसाठी कारणीभूत आहे. उच्च उत्पन्न असलेल्या देशांमध्ये कर्करोगापासून वाचण्याचा दर ८० टक्क्यांपेक्षा जास्त असला तरी, कमकुवत आरोग्य सेवा सिस्टम्समुळे कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमध्ये परिणाम अत्यंत बिकट आहेत.
(लेखक – डॉ. मोनिका भगत, कन्सल्टण्ट- पेडिएट्रिक सर्जिकल ऑन्कोलॉजी – नारायणा हेल्थ एसआरसीसी चिल्ड्रन्स हॉस्पिटल)