
मुंबई :
मुंबई विद्यापीठातील जर्मन विभागातील सहाय्यक प्राध्यापक डॉ. श्रीकांत अरुण पाठक यांना यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार २०२३च्या प्रौढ वाङ्मय (अनुवादित) श्रेणीतील तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी पुरस्कार प्रदान करण्यात आला. महाराष्ट्र शासनाने दिलेल्या या पुरस्कारात स्मृतीचिन्ह आणि रुपये १ लाख असे पारितोषिकाचे स्वरुप आहे. डॅनियल केलमान यांच्या ‘रूम’ या जर्मन कादंबरीचा ‘नाव. नऊ कथांची कादंबरी’ या नावाने कलासक्त पुणे यांनी प्रकाशित केलेल्या उत्कृष्ट मराठी अनुवादासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाने मराठी भाषा गौरव दिनानिमित्त गेटवे ऑफ इंडिया येथे पुरस्कार वितरण आणि सत्कार समारंभाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते डॉ. पाठक यांना सन्मानित करण्यात आले.
डॉ. श्रीकांत अरुण पाठक यांनी जर्मनीतील फेश्ता येथे समकालीन जर्मन साहित्यात पीएच.डी. पूर्ण केली असून ते २०१४ पासून मुंबई विद्यापीठाच्या जर्मन विभागात सहाय्यक प्राध्यापक कार्यरत आहेत. प्रख्यात अनुवादक प्रा. सुनंदा महाजन आणि गोएथे इन्स्टिट्यूट, मुंबईच्या डिजिटल ट्रान्सलेशन अकादमी यांच्याकडून साहित्यिक अनुवादाचे प्रशिक्षण घेतलेल्या डॉ. पाठक यांनी जर्मनमधून मराठीत केलेला हा पहिला मोठा अनुवाद आहे. नऊ गुंतागुंतीच्या कथा असलेल्या या कादंबरीने मराठी वाचकांना ‘मेटाफिक्शन’द्वारे कथनाची एक नवीन पद्धत सादर केली आहे.