
मुंबई :
वारंवार रक्तस्राव होत असल्याने त्रस्त असलेल्या एका पाच महिन्यांच्या गर्भवती महिलेच्या हिरड्यांमधून कॅपिलरी हेमॅन्गिओमा या आजाराची गाठ कामा रुग्णालयाच्या डॉक्टरांनी यशस्वीरित्या काढली. अनेक रुग्णालयांमध्ये फेऱ्या मारल्यानंतर अखेर कामा रुग्णालयामध्ये तिच्यावर उपचार करण्यात आल्याने या महिलेला दिलासा मिळाला आहे. शस्त्रक्रियेनंतर या महिलेवर कामा रुग्णालयाच्या हाय डिपेंडन्सी युनिटमध्ये डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार करण्यात येत आहेत.
उत्तर प्रदेशमधील मुराराबाद येथे राहत असलेली २५ वर्षीय एका महिलेला पाच महिन्यांपूर्वी डाव्या बाजूच्या वरच्या हिरड्यांना अचानक सूज आली. ही सूज हळूहळू वाढून वाटाण्याइतकी मोठी होऊन लालसर दिसू लागली. त्यामुळे तिला बोलताना व अन्न चावताना त्रास होत असे. काही दिवसांनंतर वाटाण्यासारख्या झालेल्या या सूजेतून अचानक बारीक रक्तस्राव होऊ लागला. त्यामुळे तिने उत्तर प्रदेशमधील स्थानिक डॉक्टरकडे उपचार सुरू केले. मात्र दोन महिन्यांनंतर ती सूज अचानक वाढू लागली. त्यामुळे तिने उत्तर प्रदेशातील अनेक दंतवैद्य आणि स्त्रीरोगतज्ज्ञांचा सल्ला घेतला. त्या सर्वांनी तिला उपचारांसाठी मोठ्या रुग्णालयांमध्ये जाण्याचा सल्ला दिला. त्यानुसार ती उत्तर प्रदेशमधील सरकारी रुग्णालयांमध्ये उपचारासाठी गेली. मात्र तिला काहीच फरक पडत नव्हता. याउलट त्रास व वेदना अधिक वाढू लागले होत. अखेर २७ फेब्रुवारी २०२५ रोजी ती जे.जे. रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाली. तेथील दंत विभाग आणि रेडिओलॉजी विभागातील तज्ज्ञांनी तिची तपासणी केल्यावर तिला सेंट जॉर्जेस रुग्णालयाच्या आवारात असलेल्या शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला. दंत महाविद्यालयातील डाॅक्टरांनी तिची तपासणी केल्यावर तिच्या ओठाच्या पृष्ठभागावर ५x४x४ सेमी अंडाकृती, अनियमित, व्रण असलेला, लालसर तपकिरी, कोमल गाठ असल्याचे आढळून आले. ही गाठी कॅपिलरी हेमॅन्गिओमा या आजाराची गाठ असल्याचे लक्षात आले.
कॅपिलरी हेमॅन्गिओमाची ही गाठ काढण्यासाठी शस्त्रक्रिया करणे आवश्यक असल्याचे डाॅक्टरांनी त्या महिलला सांगितले. तसेच तिला ४ मार्च २०२५ रोजी कामा रुग्णालयात शस्त्रक्रियेसाठी पाठविण्यात आले. अखेर ७ मार्च २०२५ रोजी कामा रुग्णालयात प्रसूतीतज्ज्ञांच्या देखरेखीखाली तिच्यावर शस्त्रक्रिया करून हेमॅन्गिओमा पूर्णपणे काढून टाकण्यात आला. ही शस्त्रक्रिया करताना महिलेल्या ओठातून कमीत कमी रक्तस्त्राव झाला. तसेच त्या महिलेने चांगल्या प्रकारे शस्त्रक्रियेला प्रतिसाद दिला. कामा रुग्णालयातील हाय डिपेंडन्सी युनिटमध्ये डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली तिच्यावर पुढील उपचार करण्यात येत आहेत, अशी माहिती कामा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. तुषार पालवे यांनी दिली.