
मुंबई :
व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी राबविण्यात येणाऱ्या प्रवेश प्रक्रियेचा डोलारा राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या (सीईटी सेल) अपुऱ्या मनुष्यबळाच्या खांद्यावर आहे. मंजूर ३० पदांपैकी फक्त १३ पदे मागील १० वर्षांत भरलेली आहेत. यामुळे प्रवेश परीक्षेसाठी दरवर्षी अर्ज करणाऱ्या १३ लाखांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना सोयीसविधा उपलब्ध करताना राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या आयुक्तांसह कर्मचाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांची पारदर्शक प्रवेश प्रक्रिया राबविण्यासाठी राज्य सरकारतर्फे २०१५ मध्ये राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाची स्थापना करण्यात आली. राज्य सामाईक प्रवेशा परीक्षा कक्षाकडून सुरळीत व पारदर्शकपणे प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत असल्याने अनेक व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षेची जबाबदारी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षावर सोपविण्यात आली आहे. मात्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष स्थापनेवेळी मंजूर केलेल्या ३० पदांपैकी निम्म्यापेक्षा जास्त पदे १० वर्षांनंतरही रिक्त आहेत. राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाचा डोलारा हा अवघ्या १३ कर्मचाऱ्यांच्या खांद्यावर आहे. यातील फक्त आयुक्त आणि लेखापाल ही दाेनच पदे राज्य सरकारतर्फे भरण्यात आली आहेत. चार पदे प्रतिनियुक्तीने आली आहेत. तर उर्वरित सर्व सात पदे ही कंत्राटीपद्धतीने भरण्यात आली आहेत.
परीक्षेसाठी नोंदणी प्रक्रिया राबविणे, परीक्षा घेणे, परीक्षांसाठी राज्यसह परराज्यात केंद्र उपलब्ध करणे, ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेणे, गुणवत्ता यादी जाहीर करणे, प्रवेश प्रक्रिया राबविणे, महाविद्यालयांशी संपर्क साधून त्यांना प्रवेश प्रक्रिया समजावणे अशी अनेक कामे उपलब्ध कर्मचाऱ्यांना करावी लागत आहेत. राज्य सामाईक प्रवेश परीक्षेचा डोलारा अपुऱ्या मनुष्यबळाच्या खांद्यावर असल्याने विद्यार्थ्यांना सुविधा पुरविण्यासाठी कर्मचाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
प्रतिनियुक्तीनेही येण्यास कर्मचाऱ्यांचा नकार
राज्य सरकारकडून पदभरती करण्यात येत नसल्याने राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून उच्च व तंत्र शिक्षण, कृषी शिक्षण, वैद्यकीय शिक्षण व कला शिक्षण विभागाकडून प्रतिनियुक्तीने मनुष्यबळ देण्याची मागणी करण्यात येत आहे. मात्र अनेक विभागातील कर्मचारी प्रतिनियुक्तीवरही येण्यास तयार नाहीत. त्यामुळे राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाची अधिक अडचण होत आहे.
परीक्षा समन्वयकाची पदेही रिक्त
प्रवेश परीक्षा घेण्याची मुख्य जबाबदारी ही परीक्षा समन्वयक व सहाय्यक परीक्षा समन्वयकांवर आहे. सीईटी कक्षामध्ये या दोन्ही पदासाठी १२ जागा आहेत. मात्र त्यातील आठ जागा रिक्त असून, फक्त दोन परीक्षा समन्वयक व दोन सहाय्यक परीक्षा समन्वयक ही पदे प्रतिनियुक्तीने भरण्यात आली आहेत.
प्रवेश नियामक प्राधिकरणची पदेही रिक्त
सीईटी कक्षाकडून प्रवेश देण्यात येणाऱ्या विद्यार्थ्यांची प्रवेश निश्चित करण्याची जबाबदारी असलेल्या प्रवेश नियामक प्राधिकरणालाही अपुऱ्या मनुष्यबळाचा सामना करावा लागत आहे. प्राधिकरणासाठी मंजूर २२ पदांपैकी फक्त सहा पदे भरण्यात आली आहेत. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांच्या प्रवेश निश्चितीची प्रक्रिया रखडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
रिक्त पदे भरल्या सीईटीचे कामकाज अधिक चांगल्या पद्धतीने होऊ शकते. त्यामुळे रिक्त पदे भरण्याबाबत उच्च व तंत्र विभागाकडे वारंवार प्रस्ताव पाठविण्यात आले आहेत.
– दिलीप सरदेसाई, आयुक्त, सीईटी कक्ष