
मुंबई :
कर्नाटकमधील १५ वर्षाच्या मीराला अचानक दम लागू लागल्याने तिच्या पालकांनी तिला डाॅक्टरकडे नेले. त्यावेळी डॉक्टरांनी तिच्या हृदयात छिद्र असून, हृदयातील एक झडप खराब झाली असल्याचे सांगितल्याने त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. मजुरी करून गुजराण करणाऱ्या मीराच्या पालकांसमोर शस्त्रक्रिया कशी करायचा असा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र जे.जे.रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या मीरावर येथील डॉक्टरांनी तातडीने मोफत शस्त्रक्रिया करत तिला जीवदान दिले.
कर्नाटकमधील एका छोट्या गावात राहणारे मजुरी करून आपली गुजराण करणारे भीमराव बंदी यांची १५ वर्षाची मुलगी मीरा हिला खेळताना, चालताना अचानक दम लागायला लागला. तिला उपचारासाठी रुग्णालयात नेले असता विविध तपासण्यांनंतर तिच्या हृदयात छिद्र असण्याबरोबरच हृदयातील एक झडप खराब झाली असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. हे एकून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. तसेच डाक्टरांनी तातडीने शस्त्रक्रिया करणे आवश्यक असल्याचे सांगितले. गावातील कोणत्याही शासकीय रुग्णालयांमध्ये अशी जटिल शस्त्रक्रिया करण्याची सुविधा नव्हती, तर खासगी रुग्णालयांमधील उपचार परवडणारे नसल्याने त्यांनी अनेकांकडे विचारपूस केल्यावर त्यांना मुंबईतील जे.जे. रुग्णालयामध्ये जाण्याचा सल्ला काहीजणांनी दिला. काही पैसे गाठीला घेऊन २१ मार्च २०२५ रोजी भीमराव मीराला घेऊन जे. जे. रुग्णालयात आले. सीव्हीटीएस विभागाच्या बाह्यरुग्ण विभागामध्ये सहाय्यक प्राध्यापक डॉ. सूरज नागरे यांनी मीराची तपासणी केली. त्यानंतर त्यांनी मीराला शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयात भरती करण्यास सांगितले. भीमराव यांनी त्यांची आर्थिक परिस्थिती डॉक्टरांना सांगितली. त्यावर डॉक्टरांनी शस्त्रक्रियेचा पूर्ण खर्च शासनाच्या योजनेअंतर्गत करण्यात येईल. तसेच तुम्हाला काहीही पैसे भरावे लागणार नसल्याचे सांगत त्यांना दिलासा दिला.
मीराला रुग्णालयात दाखल केल्यानंतर तिच्या इको स्कॅन, सीटी स्कॅन यासारख्या तपसाण्या तातडीने व सरकारी योजनेतून करण्यात आल्या. त्यानंतर ५ एप्रिल रोजी मीरावर शस्त्रक्रिया करत तिच्या हृदयातील छिद्र बंद करत खराब झडप दुरुस्त करण्यात आली. ही शस्त्रक्रिया मुख्य शल्यचिकित्सक डॉ. सूरज नागरे यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. शस्त्रक्रियेच्या तुकडीमध्ये सहाय्यक प्राध्यापक डॉ. दीपक जैस्वाल, वरिष्ठ निवासी डॉक्टर डॉ. उदय रविकुमार, डॉ. ज्योती दास, भूलतज्ज्ञ डॉ. अश्विन सोनकांबळे, परिचारिका लता करें, जयश्री तिकुडिवे, अंकिता इंगळे, आणि राजू दाऊद यांचा समावेश होता. जे.जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय भांडारकर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय सुरासे आणि विभागप्रमुख डॉ. आशिष भीवापूरकर यांचे मार्गदर्शन लाभले.
कर्नाटकमधील एका छोट्याशा गावातून आलो असूनही आम्हाला उत्तम आणि मोफत आरोग्यसेवा मिळेल, याची आम्हाला कल्पनाही नव्हती. डॉक्टरांनी मुलीचे जीवन परत दिल्याने आम्ही त्यांचे सदैव ऋणी आहोत, असे मीराचे वडील भीमराव यांनी सांगितले.
शस्त्रक्रियेनंतर कोणताही त्रास नाही
शस्त्रक्रियेनंतर मीराला दोन दिवस अतिदक्षता विभागामध्ये निरीक्षणासाठी ठेवण्यात आले. दोन दिवसांनंतर तिला रुग्णकक्षात हलविण्यात आले. तिथे तिची नियमित तपासणी, मलमपट्टी करण्यात येत होती. शस्त्रक्रियेनंतर केलेल्या हृदय स्कॅनमध्ये तिचं हृदय उत्तम प्रकारे कार्य करत असल्याचे स्पष्ट झाले. शस्त्रक्रियेला पाच दिवस उलटल्यानंतरही तिला कोणताही त्रास नसल्याने तिला लवकरच घरी सोडण्यात येईल, असे डॉ. सूरज नागरे यांनी सांगितले.