शहर

पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील कोरड्या जमीनीमुळे भारतात उष्णतेच्या लाटा

वाढलेल्या तापमानाबाबत आयआयटी मुंबईचे संशोधन

मुंबई :

मार्च व एप्रिल २०२२ मध्ये आशियाई देशामध्ये सलग दोन अति उष्णतेच्या लाटा आल्या होत्या. या लाटांमागील कारण शोधण्यास शास्त्रज्ञांना यश आले आहे. वेगवेगळ्या वातावरणीय प्रक्रियांमुळे उष्णतेच्या लाटांचे परिणाम वाढले असले तरी कोरड्या मातीमुळे पाकिस्तान व अफगाणिस्तानमधील वायव्य भूभागातून भारतात उष्णतेच्या लाटा निर्माण झाल्या असल्याचे संशोधनातून स्पष्ट झाले आहे.
भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई (आयआयटी मुंबई) आणि जर्मनीमधील जोहान्स गुटेनबर्ग-युनिव्हर्सिटी मेंझ येथील संशोधकांनी मार्च व एप्रिल २०२२ मध्ये दक्षिण आशियाई देशामध्ये सलग आलेल्या दोन अति उष्णतेच्या लाटांचा अभ्यास केला. या अभ्यासामध्ये मार्च आणि एप्रिल २०२२ मधील तापमान हे सामान्य श्रेणीपेक्षा जास्त होते. हे तापमान वाढण्यामागे वेगवेगळ्या वातावरणीय प्रक्रिया कारणीभूत होत्या. मात्र मार्चमधील उष्णतेची लाट प्रामुख्याने अल्पकालीन वातावरणातील रॉसबी लाटांच्या विशालतेत अचानक वाढ झाल्यामुळे होती. या लाटा उंचावरच्या वाऱ्यांमध्ये अधिक प्रमाणात असतात, असे अभ्यासाचे प्रमुख लेखक रोशन झा यांनी सांगितले. उष्णतेच्या लाटेदरम्यान ध्रुवांजवळील उच्च-उंचीवरील पश्चिमेकडील वारे (उष्णकटिबंधीय तीव्र वाफा) विषुववृत्ताच्या जवळ असलेल्या पश्चिमेकडील वाऱ्यांना (उष्णकटिबंधीय तीव्र वाफा) ऊर्जा हस्तांतरित करत असताना लाटा अधिक मजबूत झाल्याचे झा यांनी सांगितले.

हेही वाचा : दादर व चेंबूर येथील जलतरण तलावांमध्ये मिळणार पोहण्याचे प्रशिक्षण, २१ एप्रिलपासून ऑनलाईन नावनोंदणी सुरू

एप्रिलमधील उष्णतेची लाट येण्यामागे वेगळे कारण असल्याचे अभ्यासातून दिसून आले. मार्चमधील लाट ही उंचावरील वाऱ्यांमुळे आली असली तरी एप्रिलमधील उष्णतेची लाट ही उंचावरील वाऱ्यांमुळे नव्हे तर कोरड्या मातीमुळे आणि पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या वायव्य भूभागातून भारतात वाहलेल्या उष्णतेच्या प्रवाहामुळे आली होती. मार्चमध्ये आलेल्या उष्णतेच्या लाटेमुळे जमीन कोरडी झाली होती. त्यातच एप्रिलमध्ये उच्च तापमान आणि निरभ्र आकाशामुळे जमीन आधीच कोरडी झाली. परिणामी एप्रिलमध्ये आलेली उष्णतेची लाट ही पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील कोरड्या जमीनीमुळे आली असल्याचे संशोधकांना अभ्यासात आढळून आले. यातून एक उष्णतेची लाट मातीतील ओलावा काढून टाकून पुढील आठवड्यात दुसऱ्या, अधिक तीव्र उष्णतेच्या घटनेसाठी आधार देऊ शकते. जेव्हा माती खूप कोरडी होते, तेव्हा ती एक चक्र तयार करते ज्यामुळे पुढील उष्णतेची लाट आणखी तीव्र असते, असे या संशोधनातून उघडकीस आले. मातीमध्ये ओलावा असतो, त्यावेळी सूर्याची ऊर्जा हवा गरम करण्याऐवजी त्या ओलाव्याचे बाष्पीभवन करते. पण माती जेव्हा आधीच कोरडी असते, त्यावेळी सूर्याची ऊर्जा हवा गरम करते, असे आयआयटी मुंबई येथील सहाय्यक प्राध्यापक आणि अभ्यासाच्या सहलेखिका प्रा. अर्पिता मोंडल यांनी सांगितले.

हेही वाचा : बाळावर यकृत प्रत्यारोपणाची दुर्मिळ शस्त्रक्रिया यशस्वी

‘२०२२ मध्ये सलग पूर्व-मान्सून दक्षिण आशियाई उष्णतेच्या लाटांचे विरोधाभासी चालक : वेव्हगाईड परस्परसंवाद आणि मातीतील ओलावा कमी होणे’ या शीर्षकाचा हा अभ्यास अमेरिकन जिओफिजिकल युनियनने प्रकाशित केलेल्या जर्नल ऑफ जिओफिजिकल रिसर्च : ॲटमॉस्फीयर्स, वातावरणीय संशोधनाचे वैज्ञानिक जर्नल या पुस्तकात प्रकाशित झाला आहे.

उष्णतेच्या लाटांचे परिणाम कमी करण्यास मदत

दक्षिण आशियातील अति उष्णतेच्या घटनांचा अंदाज घेण्याची आणि क्षमता सुधारण्यासाठी या यंत्रणा समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. हवामानातील बदल वातावरणातील वाऱ्यांच्या पद्धतींवर परिणाम करतात. त्यामुळे या विशिष्ट घटकांची ओळख पटवल्याने भविष्यातील उष्णतेच्या लाटांचे चांगल्या प्रकारे अंदाज लावण्यास आणि परिणाम कमी करण्यास मदत होऊ शकते, असे प्रा. सुबिमल घोष यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *