
मुंबई :
राष्ट्रीय चाचणी संस्थेमार्फत (एनटीए) घेण्यात येणाऱ्या संयुक्त प्रवेश परीक्षा (जेईई) २०२५ मुख्य सत्र – २ च्या पेपर १ चा निकाल शुक्रवारी रात्री जाहीर करण्यात आला. या परीक्षेमध्ये २४ विद्यार्थ्यांनी १०० टक्के गुण मिळवले असून, राजस्थानचा एम.डी. अनस हा देशातून पहिला आला. त्याचप्रमाणे मुलींमध्ये पश्चिम बंगालच्या देवदत्त माझी आणि आंध्र प्रदेशच्या साई मनोगना गुठीकोंडा यांनी १०० टक्के गुण मिळवले आहेत. महाराष्ट्रातून तीन विद्यार्थ्यांनी १०० टक्के गुण मिळवले आहेत. यामध्ये महाराष्ट्राचा आयुष चौधरी, सानिध्य सराफ आणि विशाद जैन यांनी १०० टक्के गुण मिळवले आहेत.
हेही वाचा : मेट्रोच्या कामामुळे घाटकोपर, कुर्ला, मानखुर्द, शीव आणि परळ भागात २४ तास पाणीपुरवठा बंद
एनटीएमार्फत २ ते ९ एप्रिलदरम्यान जेईई मुख्य सत्र २ ची परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेत २, ३, ४, ७ आणि ८ एप्रिल रोजी पेपर १ (बीई, बीटेक), तर पेपर २ (बीएआरएच आणि बीप्लॅन) ९ एप्रिल रोजी घेण्यात आला. जेईई मुख्य सत्र २ या परीक्षेचा निकाल १८ एप्रिल रोजी रात्री उशीरा जाहीर एनटीएकडून करण्यात आला. या परीक्षेसाठी देशभरातून १० लाख ६१ हजार ८४० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ९ लाख ९२ हजार ३५० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यातील २४ विद्यार्थ्यांनी १०० टक्के गुण मिळवले. यामध्ये महाराष्ट्रातील आयुष रवी चौधरी, सानिध्य सराफ आणि विशाद जैन यांनी १०० टक्के गुण मिळवले आहेत.
हेही वाचा : बाळावर यकृत प्रत्यारोपणाची दुर्मिळ शस्त्रक्रिया यशस्वी
जेईई मुख्य २०२५ सत्र १ च्या पेपर १ (बीई आणि बीटेक) ची परीक्षा २२ ते २९ जानेवारी २०२५ दरम्यान झााली होती. या परीक्षेचा निकाल ११ फेब्रुवारी २०२५ रोजी जाहीर झाला होता. सत्र १ च्या परीक्षेला १२ लाख ५० हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. यातील १४ विद्यार्थ्यांनी १०० टक्के गुण मिळवले होते. सत्र १ च्या तुलनेत सत्र २ मध्ये १०० टक्के गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे.
राजस्थानमधून सर्वाधिक सात विद्यार्थी अव्वल
एनटीएने जाहीर केलेल्या निकालामध्ये राजस्थानमधून सर्वाधिक सात विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण मिळवले आहेत. त्याखालोखाल महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि तेलंगणामध्ये प्रत्येकी तीन विद्यार्थ्यांनी तसेच पश्चिम बंगाल, गुजरात, दिल्लीमध्ये प्रत्येकी दोन विद्यार्थ्यांनी १०० टक्के गुण मिळवले आहेत. कर्नाटक व आंध्र प्रदेशमध्ये प्रत्येकी एका विद्यार्थ्यांनी १०० टक्के गुण मिळवले आहेत.
फक्त दोन मुलींना १०० टक्के गुण
जेईई मुख्य सत्र २ परीक्षेच्या निकालामध्ये १०० टक्के गुण मिळवलेल्या २४ विद्यार्थ्यांमध्ये फक्त दोन मुलींचा समावेश आहे. यामध्ये पश्चिम बंगालची देवदत्त माझी आणि आंध्र प्रदेशची साई मनोगना गुठीकोंडा यांनी १०० टक्के गुण मिळवले आहेत. आंध्र प्रदेशच्या साई मनोगना गुठीकोंडा हिने जेईई मुख्य सत्र १ मध्ये सुद्धा १०० टक्के गुण मिळवले होते. तिने आपली कामगिरी कायम ठेवली आहे. तसेच देवदत्त माझी हिल जेईई मुख्य सत्र १ मध्ये ९९.९९९२१ टक्के गुण मिळाले होते.