
मुंबई :
महाराष्ट्रातील गरजू रुग्णांसाठी ‘संजीवनी’ ठरत असणाऱ्या मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीची लाखो रुपयांची फसवणुक केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. उल्हासनगर येथील तीन डॉक्टरांनी बनावट कागदपत्रे आणि रुग्ण नोंदी तयार करून तब्बल ४ लाख ७५ हजार रुपयांचा निधी हडपल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे प्रभारी सहायक संचालक देवानंद धनावडे यांच्या फिर्यादीवरून खडकपाडा पोलीस ठाण्यात १७ एप्रिल २०२५ रोजी गुन्हा दाखल झाला आहे. शासनाने या प्रकरणी कडक कारवाईचा इशारा दिला आहे.
घटनाक्रम : १३ बनावट रुग्ण, सहा जणांना लाभ
सदरील फसवणूक प्रकरणात, डॉ. अनुदुर्ग ढोणे (वय ४५, रा. कल्याण, ठाणे), डॉ. ईश्वर पवार (रा. धुळे) आणि डॉ. प्रदीप पाटील (वय ४१, रा. गौरीपाडा, ठाणे) या तिघा आरोपींनी २६ मे २०२३ ते १० जुलै २०२३ या कालावधीत १३ बनावट रुग्णांचे अर्ज सादर केले. यापैकी ६ प्रकरणांमध्ये ४ लाख ७५ हजार रुपये अर्थसहाय्यच्या नावाखाली फसवणूक केली. या अर्जांमध्ये रुग्णांची नावे, वैद्यकीय कागदपत्रे, युटिलायझेशन सर्टिफिकेट आणि अंदाजपत्रके बनावट असल्याचे तपासात उघड झाले. आरोपीनी बँक ऑफ बडोदा बँकेच्या खाते क्र. ७६१२०२००००२५६० (IFSC: BARB0VJMOHO) मध्ये ही रक्कम जमा केली.
संशय आल्याने ‘स्कॅम’ उघडकीस
दिनांक ११ जुलै २०२३ रोजी अर्ज क्रमांक ९६६८/२०२३ (रुग्ण: अरविंद सोळखी, मेंदूच्या उपचारासाठी ३ लाख ७० हजार रुपये) आणि अर्ज क्रमांक ९६६७/२०२३ (रुग्ण: भगवान भदाने, मेंदूच्या उपचारासाठी ३ लाख १० हजार रुपये) या दोन प्रकरणांमध्ये संशयास्पद बाबी समोर आल्या होत्या. छाननी दरम्यान रुग्णालयाच्या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधला असता, अरविंद सोळखी यांचे सरस्वती हॉस्पिटल, नालासोपारा येथे, तर भगवान भदाने यांचे गणपती हॉस्पिटल, अंबिवली येथे दाखल असल्याचे उघड झाले, जे अर्जातील माहितीशी विसंगत होते. त्यानंतर तत्कालीन प्रभारी अधिकारी शिरीष पालव यांनी १५ जुलै २०२३ रोजी पथकासह गणपती हॉस्पिटलची पाहणी केली, परंतु डॉ. ढोणे यांनी कोणतीही कागदपत्रे किंवा नोंदवही सादर केली नाहीत. रुग्णालयात ३५ बेड असल्याचा दावा असला, तरी प्रत्यक्षात २५ पेक्षा कमी बेड आढळले, तर ऑपरेशन थिएटर (ओटी) आणि आयसीयू बंद असून त्यातून दुर्गंधी येत असल्याचा उल्लेख तक्रारीत करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक तुकाराम जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू आहे.
आरोपी पसार…
१७ जुलै २०२३ रोजी डॉ. ढोणे यांना मुख्यमंत्री संचिवालयात चौकशीसाठी बोलावण्यात आले, परंतु ते हजर झाले नाहीत. त्यांनी आपल्या जबाबात ईश्वर पवार आणि प्रदीप पाटील यांनी रुग्णालयाला पॅनेलवर घेण्यासाठी मदत केल्याचे सांगितले. अर्जांमध्ये रुग्ण किंवा नातेवाइकांचे संपर्क क्रमांक ऐवजी पवार आणि पाटील यांचे क्रमांक नमूद असल्याचेही उघड झाले. पाहणी पथकाने नोंदवले की, डॉ. ढोणे यांनी पथकाला ‘मुलाला शाळेतून आणण्यासाठी जायचे आहे’ असे सांगून रुग्णालयातून पलायन केले, आणि पुन्हा हजर झालेचं नाहीत.
शासनाची तीव्र नाराजी आणि कारवाई
मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांनी या प्रकाराला गंभीरतेने घेत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी सांगितले, गरीब रुग्णांच्या हक्काच्या पैशांवर डल्ला मारणाऱ्या फसवणूक करणाऱ्यांवर शासन कोणतीही सूट देणार नाही. या प्रकरणात दोषींवर कठोर कारवाई होईल आणि भविष्यात अशा प्रकाराची पुनरावृत्ती रोखण्यासाठी कडक पावले उचलली जातील.