शहर

Jain Temple : विलेपार्ले येथील जैन मंदिर तोडक कारवाई प्रकरणी मंत्री लोढा यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

मुंबई :

विलेपार्ले पूर्व येथील १००८ पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर नुकतेच महापालिकेच्या कारवाईत पाडण्यात आले. हे मंदिर मागील ३५ वर्षे परिसरातील नागरिकांचे श्रद्धास्थान राहिले असून, त्याचा धार्मिक आणि सांस्कृतिक जीवनाशी घनिष्ठ संबंध राहिलेला आहे. हे प्रकरण सध्या उच्च न्यायालयात प्रलंबित असताना, न्यायालयाकडून स्थगिती आदेश मिळाल्याच्या दिवशीच मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी मंदिर पाडले, ही घटना अत्यंत खेदजनक आणि निषेधार्ह आहे. या प्रकरणात कॅबिनेटमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी जैन समाजाच्या प्रतिनिधींना सोबत घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांवर तात्काळ चौकशी करून शिस्तभंगाची कारवाई करण्याची तसेच मंदिराच्या जागेची पाहणी करून त्याच ठिकाणी लवकरात लवकर मंदिराची पुनर्बांधणी करण्याची मागणी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर सकारात्मक प्रतिसाद दिला असून, महापालिका प्रशासनाने संबधित विषयात लक्ष घालावे आणि कोणाच्याही धार्मिक भावना दुखावणार नाहीत, याबाबत दक्षता घ्यावी असे सांगितले आहे.

“विलेपार्ले येथील पूज्य श्री पार्श्वनाथ भगवान यांचे जैन मंदिर हटवण्याच्या घटनेमुळे जैन समुदायाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. ते केवळ धार्मिक स्थळ नव्हते, तर समाजाच्या श्रद्धेचे आणि भक्तीचे केंद्र देखील होते. त्यामुळे संबधित अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी, अशी आमची मागणी आहे.” असे मंगल प्रभात लोढा यावेळी म्हणाले. यानंतर मंत्री लोढा यांनी मुंबई महापालिकेच्या आयुक्तांची भेट घेतली. संबंधित अधिकाऱ्यांसोबत तात्काळ संयुक्त बैठक घेण्यात यावी, असे निर्देश महापालिका प्रशासनाला त्यांनी दिले असून, ही बैठक होईपर्यंत प्रशासनाने या विषयाची गांभीर्याने दखल घेऊन आवश्यक ती कार्यवाही करावी, असे निर्देशही दिले आहेत. यावेळी मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्यासह आमदार पराग आळवणी, आमदार मुरजी पटेल आणि जैन समाजातील प्रतिनिधी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *