
बदलापूर येथे होम प्लॅटफॉर्म (Local Train) प्रवाशांच्या सोयीसाठी नव्हे, तर गैरसोयीसाठी उभारण्यात आल्याची प्रवाशांची भावना बळावत आहे. होम प्लॅटफॉर्ममुळे गर्दी विखुरली जाईल, अशी अपेक्षा असताना रेल्वे प्रशासनाने फलाट क्र. १ बंद केल्याने संपूर्ण प्रवाशांची गर्दी आता होम प्लॅटफॉर्मवर होत आहे. त्यामुळे सायंकाळी लोकल होम प्लॅटफॉर्मवर आल्यानंतर प्रवाशांना स्टेशनबाहेर निघण्यासाठी वेळ लागतो. गर्दी प्रचंड झाल्यामुळे चेंगराचेंगरीची भीती वाढली आहे.
बदलापुरातील होम प्लॅटफॉर्म सध्या बदलापूरकरांसाठीच डोकेदुखी ठरत आहे. या होम प्लॅटफॉर्मची उभारणी करत असताना रेल्वेचे नियोजन चुकल्याचे दिसते . त्यामुळे आता प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. बदलापूर लोकल मधून उतरलेले प्रवासी कर्जत लोकल पकडण्यासाठी रेल्वे रूळ ओलांडत आहेत. त्यावेळी कर्जतहून मुंबईकडे जाणारी मेल, एक्सप्रेस गाडीखाली येऊन प्रवासी चिरडले जाण्याची दाट शक्यता आहे. वेळेवर लोकलसेवा सुरु असल्यास गर्दी कमी होत राहून चेंगराचेंगरीचा धोका काहीसा कमी होतो.
चेंगराचेंगरीची शक्यता
सायंकाळी होम प्लॅटफॉर्मवर बदलापूर लोकल आल्यानंतर लोकलमधून उतरण्यासाठी प्रवाशांना जागा शिल्लक राहत नाही. संपूर्ण होम प्लॅटफॉर्म तुडुंब भरत असल्यामुळे या ठिकाणी चेंगराचेंगरी होण्याचा धोका निर्माण झाला आहे.
होम प्लॅटफॉर्म अरुंद
होम प्लॅटफॉर्मची उभारणी करताना जागेअभावी प्रशासनाने हा प्लॅटफॉर्म अरुंद उभारला. मात्र प्रवाशांना दोन्ही ठिकाणी उतरण्याची संधी असल्यामूळे समस्या जाणवली नाही. मात्र आता फलाट क्र. १ वर ग्रील लावल्यामुळे होम प्लॅटफॉर्मवर गर्दी वाढली आणि या वाढलेल्या गर्दीमुळे प्लॅटफॉर्म अरुंद वाटत आहे. यामुळे दुर्घटना घडू शकते.
गिरणी कामगारांना मुंबईत घरे उपलब्ध करून द्या – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
पावसाळ्यात धोका
होम प्लॅटफॉर्मवर काही ठिकाणी शेड टाकलेली नाही. त्यामुळे उन्हात उभे राहण्याऐवजी प्रवासी ब्रिज खाली उभे राहतात. त्याच ठिकाणी प्रचंड गर्दी होते पावसाळ्यापर्यंत शेड उभारली नाही, तर अशीच परिस्थिती पावसाळ्यात निर्माण होणार असून, एकाच ठिकाणी गर्दी वाढल्यामुळे चेंगराचेंगरीचा धोका वाढणार आहे.