
भडगाव :
दिल्लीच्या छत्रसाल स्टेडियमवर कोळगावच्या ओमकार कराळे आणि स्वराज चौधरीने कुस्तीच्या मैदानात आपली दंगल उडवत सुवर्ण आणि रौप्य पदकांची घवघवीत कमाई केली आहे! कोळगावच्या कुस्तीच्या अखाड्यात घेतलेली मेहनत अखेर फळाला आली! त्यांच्या या गगनभेदी यशाने संपूर्ण भडगाव तालुक्यात जल्लोषाचे वातावरण आहे.
कर्मवीर तात्यासाहेब हरि रावजी पाटील किसान शिक्षण संस्था, भडगाव संचलित गोपीचंद पुना पाटील विद्यालय, कोळगाव (ता. भडगाव) येथील विद्यार्थी आणि किसान स्पोर्ट्स अकॅडमीचे उदयोन्मुख कुस्तीपटू ओमकार संतोष कराळे याने ६८ व्या राष्ट्रीय शालेय ग्रीको-रोमन कुस्ती स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावत तालुक्याचा झेंडा उंचावला आहे. त्याचबरोबर स्वराज प्रल्हाद चौधरी यानेही चमकदार कामगिरी करत रौप्य पदकाची कमाई केली आहे.
दिल्ली येथील छत्रसाल स्टेडियम, मॉडेल टाऊन येथे २२ ते २७ एप्रिल २०२५ दरम्यान स्कूल गेम फेडरेशन ऑफ इंडिया तर्फे आयोजित १७ वर्षांखालील वयोगटाच्या स्पर्धेत, ४५ किलो वजनी गटात ओमकार कराळेने दमदार खेळ करत प्रथम क्रमांक मिळवून सुवर्णपदक जिंकले. तर स्वराज चौधरीने ६० किलो वजनी गटात द्वितीय स्थान मिळवत रौप्य पदक पटकावले आहे.
स्वराज चौधरी याची यशस्वी निवड ‘खेलो इंडिया’ राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात झाली आहे, ही बाब तालुक्यासाठी भूषणावह आहे. विशेष उल्लेखनीय म्हणजे, काही दिवसांपूर्वी इंफाळ (मणिपूर) येथे पार पडलेल्या ६८ व्या राष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत स्वराजची धाकटी बहीण कु. साध्वी प्रल्हाद चौधरी हिनेही सुवर्णपदक मिळवले आहे.
ओमकार आणि स्वराज सध्या साई स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया, कांदिवली, मुंबई येथे नामवंत मार्गदर्शकांच्या देखरेखीखाली प्रशिक्षण घेत आहेत. त्यांना ट्रिपल महाराष्ट्र केसरी डी.वाय.एस.पी. विजय चौधरी, रुस्तम ए हिंद अमोल बुचडे, संतोष कराळे, प्रल्हाद चौधरी, संजय कराळे, सयाजी मदने, आदर्श क्रीडाशिक्षक बी.डी. साळुंखे, प्रा. रघुनाथ पाटील आणि राष्ट्रीय खो-खो पंच प्रा. प्रेमचंद चौधरी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे.
या शानदार कामगिरीबद्दल संस्थेचे चेअरमन प्रतापराव पाटील, सचिव डॉ. पुनमताई पाटील, मंत्रालयीन उपसचिव प्रशांतराव पाटील, माजी नगराध्यक्ष शामकांत भोसले, माध्यमिक शिक्षक पतपेढीचे संचालक जगदीश पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य सुनिल पाटील, पर्यवेक्षक आर.एस. कुंभार तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी दोन्ही खेळाडूंचे भरभरून अभिनंदन करून उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत