
मुंबई :
एमएचटी सीईटी परीक्षेमध्ये (Exam Update) विद्यार्थ्यांना विचारण्यात आलेल्या जवळपास २० ते २५ प्रश्नांना चुकीचे पर्याय दिले आहेत. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. यातील तथ्य पडताळण्यासाठी व विद्यार्थ्यांच्या मनातील शंका दूर करण्यासाठी पुढील १० दिवसांमध्ये म्हणजेच मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात विद्यार्थ्यांना आक्षेप नोंदविण्याची संधी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून (सीईटी सेल) उपलब्ध करण्यात येणार आहे.
अभियांत्रिकी, कृषी व औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमांसाठी दरवर्षी एचएचटी सीईटी परीक्षा दोन टप्प्यांमध्ये आली. या परीक्षेसाठी सात लाखांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. कृषी आणि औषधनिर्माण शास्त्र या अभ्यासक्रमासाठी महत्त्वपूर्ण असलेली भौतिकशस्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र म्हणजेच पीसीबी गटासाठी ९ ते १७ एप्रिलदरम्यान पहिल्या टप्प्यात परीक्षा घेण्यात आली. देशभरातून पीसीबी गटासाठी ३ लाख १ हजार ७२ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते.
त्यातील २ लाख ८२ हजार ७३७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. दुसऱ्या टप्प्यात म्हणजे १९ ते २७ एप्रिलदरम्यान अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठी भौतिकशस्त्र, रसायनशास्त्र आणि गणित म्हणजेच पीसीएम या गटासाठी परीक्षा झाली. यासाठी नोंदणी केलेल्या ४ लाख ६४ हजार २६३ विद्यार्थ्यांपैकी ४ लाख २५ हजार ५४८ उपस्थित होते.
पीसीएम गटाची परीक्षा १९७ केंद्रांवर तर पीसीबी गटाची परीक्षा १६८ केंद्रांवर झाली. या परीक्षांदरम्यान अनेक विद्यार्थ्यांना काही प्रश्नांबाबत शंका उपस्थित झाल्या. तसेच अखेरच्या दिवशी झालेल्या परीक्षेवेळी जवळपास २५ प्रश्नांसाठी देण्यात आलेल्या पर्यायी उत्तरे ही चुकीची असल्याचा आरोप विद्यार्थ्यांकडून करण्यात आला होता.
परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना दिलेले पर्याय चुकीचे आहेत का हे तपासण्यासाठी पुढील १० दिवसांमध्ये म्हणजेच मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात विद्यार्थ्यांना आक्षेप नोंदविण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका व उत्तरे लॉगिन आयडीवर दिल्यानंतर विद्यार्थ्यांना आक्षेप नोंदविता येणार आहे.
या कालावधीत आक्षेप नोंदविण्यात येणाऱ्या प्रश्नांबाबत राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून नियुक्त केलेल्या समितीकडून पडताळणी करून पुढील निर्णय घेण्यात येईल, असे राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाचे आयुक्त दिलीप सरदेसाई यांनी सांगितले.
नीटमुळे सीईटी परीक्षेत बदल; विधी अभ्यासक्रमाची परीक्षा ४ ऐवजी २ मे रोजी होणार
आक्षेप योग्य असल्यास पैसे परत मिळणार
आक्षेप नोंदविण्यासाठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून प्रत्येक प्रश्नासाठी ठरावीक शुल्क आकारण्यात येते. त्यामुळे एखाद्या विद्यार्थ्यांला अधिक प्रश्नांवर आक्षेप असल्यास त्याला त्या प्रमाणात शुल्क भरावे लागणार आहे. मात्र विद्यार्थ्यांनी प्रश्नांसदर्भात नोंदविलेला आक्षेप योग्य असल्यास संबंधित प्रश्नासाठी आकारलेले शुल्क हे विद्यार्थ्याला परत करण्यात येते, अशी माहितीही राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाचे आयुक्त दिलीप सरदेसाई यांनी दिली.