
मुंबई :
आयआयटी (IIT) मुंबईतील विद्यार्थ्यांच्या वसतीगृहात आता मोठा बदल पाहायला मिळणार आहे. या संस्थेचे माजी विद्यार्थी आणि ब्राऊजरस्टॅक कंपनीचे सह-संस्थापक रितेश अरोरा आणि नाकुल अग्रवाल यांनी आयआयटीलया १०० कोटी रुपयांची देणगी जाहीर केली असून, या देणगीतून आयआयटी मुंबईतील वसतीगृहांचे आधुनिकीकरण केले जाणार आहे.
ब्राऊजरस्टॅकचे सह-संस्थापक रितेश अरोरा आणि नाकुल अग्रवाल यांनी २००६ मध्ये आयआयटी मुंबईमधून संगणक विज्ञान शाखेतून बी.टेक पदवी प्राप्त केली होती. तंत्रज्ञान क्षेत्रात त्यांनी जागतिक स्तरावर नाव कमावले आहे. या योगदानाचा एक भाग ब्राऊजरस्टॅकच्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी योजनेअंतर्गत दिला जात असून, आयआयटीमध्येशिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या वसतीगृहात आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या हेतूने ही मदत दिली जात आहे.
संस्थेच्या इतिहासात मिळालेल्या देणगीमध्ये वसतीगृहांच्या कामासाठी मिळालेली ही मोठी देणगी आहे. या देणगीतून दोन प्रमुख प्रकल्प राबवले जाणार आहेत. वसतीगृह (हॉस्टेल) ६ चे नव्याने बांधकाम आणि ‘प्रोजेक्ट एव्हरग्रीन’ अंतर्गत हॉस्टेल ७, ८ व २१ चे आधुनिकीकरण केले जाणार आहे. हॉस्टेल ६ मध्ये राहून रितेश अरोरा आणि नाकुल अग्रवाल शिक्षण घेतल्याने त्यांचे भावनिक नाते असल्याने या इमारतीचा आता चेहरामोहरा बदलला जाणार आहे.
या वसतीगृहांची रचना विद्यार्थ्यांच्या भौतिक व मानसिक आरोग्याला पोषक ठरेल अशा सुविधांनी युक्त असणार आहे. १४ हजार विद्यार्थ्यांसाठी आधुनिक, समावेशक व भविष्योन्मुख निवास सुविधा उभारण्याच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे आयआयटीने म्हटले आहे.
यावेळी रितेश अरोरा म्हणाले, “आयआयटी मुंबईने आमच्या जीवनाच्या दृष्टिकोनाला आकार दिला आणि ब्राऊजरस्टॅक उभारण्यासाठी आधार दिला. आता आम्ही केवळ वसतिगृह नव्याने बांधत नाही आहोत, तर उद्याचे तंत्रज्ञ घडवण्यासाठी पोषक वातावरण निर्माण करत असल्याचे ते म्हणाले. नाकुल अग्रवाल यांनी सांगितले की, “आमचा प्रवास हॉस्टेल ६ पासून जागतिक तंत्रज्ञान कंपनीपर्यंत पोहोचला आहे.
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार खरेदी करण्यात राज्य सरकारला यश
आम्हाला दिलेल्या संधींचे आम्ही ऋणी आहोत. हे योगदान आमच्यासाठी वैयक्तिकदृष्ट्याही खूप महत्त्वाचे आहे. आयआयटी मुंबईचे संचालक प्रा. शिरीष केदारे यांनीही त्यांचे कौतुक केले. ते म्हणाले त्यांनी दिलेली देणगी आमच्या विद्यार्थ्यांसाठी दर्जेदार शैक्षणिक वातावरण निर्माण करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे यावेळी नमूद केले.