
मुंबई:
ठाणे येथील श्री मावळी मंडळ संस्थेच्या शताब्दी वर्ष व १००व्या शिवजयंती उत्सवानिमित्त आयोजित ७२व्या राज्यस्तरीय कबड्डी (Sports) स्पर्धेत पुरुष गटात मुंबई उपनगरच्या स्वस्तिक क्रीडा मंडळाने सलग तिसऱ्यांदा जेतेपदावर नाव कोरले. महिला गटात मुंबई शहरच्या डॉ. शिरोडकर स्पोर्ट्स क्लबने बाजी मारली.
पुरुष गटातील स्वस्तिक क्रीडा मंडळास रोख ₹ १,००,०००/-, सतेज संघास रोख ₹ ७५,०००/- व महिला गटातील शिरोडकर स्पोर्ट्स क्लब संघास रोख ₹ ५५,०००/- , शिवशक्ती महिला संघास रोख ₹ ४४,०००/- व चषक देवून गौरविण्यात आले.
पुरुष गटातील अंतिम सामना गतविजेता मुंबई उपनगरचा स्वस्तिक क्रीडा मंडळ आणि स्पर्धेत प्रथमच सहभागी झालेल्या पुण्याच्या सतेज संघ ,बाणेर या दोन तुल्यबळ संघात झाला. सामन्यातील पहिली चढाई सतेज संघाच्या मनोज बांद्रे याने केली. सामन्यातील पहिला गुण स्वस्तिक क्रीडा मंडळाच्या अक्रम शेख याने गणेश शेळकेची यशस्वी पक्कड करून मिळविला.
हा सामना कबड्डी प्रेमींसाठी जणूकाही मेजवानीच होती. सामन्यातील प्रत्येक चढाईमध्ये विजयाचे पारडे वरखाली होत होते. निलेश शिंदेच्या सफाईदार पक्कडी आणि अशोक वीटकरच्या तुफानी चढायांमुळे विश्रांतीला काही मिनिटे बाकी असताना स्वस्तिकने सतेजवर पहिला लोन दिला. त्यामुळेच विश्रांतीला स्वस्तिकने ६ गुणांची आघाडी घेतली होती.
मध्यंतरानंतर सतेजच्या मनोज बांद्रेने प्रत्येक चढाईत गुण घेत आक्रमक खेळाचे प्रदर्शन केले. सामना संपायला शेवटची पाच मिनिटे शिल्लक असताना त्याने सामना २४-२७ अश्या गुणांवर आणला. सामन्याची शेवटची पाच मिनिटे अक्षरशः श्वास रोखायला लावणारी होती. शेवटची तीन मिनिटे असताना स्वस्तिकने सतेजच्या मनोज बांद्रेची अचूक पक्कड केली. तिचं शेवटी निर्णायक ठरली. येथूनच पुढे सतेजची सामन्यावरील पकड सुटली आणि स्वस्तिकची सामन्यावरील विजयाची पकड अधिक घट्ट होत गेली. शेवटी स्वस्तिक क्रीडा मंडळाने ३३-३० गुणांनी शानदार विजय मिळवला.
महिला गटातील निर्णायक लढत मुंबई शहरच्याच डॉ. शिरोडकर स्पोर्ट्स क्लब, शिवशक्ती महिला संघ ह्या दोन बलाढ्य संघात चांगलीच रंगली. डॉ. शिरोडकरने ही चुरशीची लढत अखेर २६-२१ गुणांनी जिंकून विजेते पदाला गवसणी घातली. या सामन्यात दोन्ही संघांनी सुरुवातीला काहीसा सावध पवित्रा घेतला होता. त्यामुळेच विश्रांतीपर्यंत हा सामना काहीसा संथ गतीने सुरू होता. विश्रांतीला दोन्ही संघांची ९-९ गुणांची बरोबरी होती.
विश्रांतीनंतर शिवशक्तीची स्टार खेळाडू पूजा यादव मैदानात उतरली. तिने तुफानी चढाया करुन बरेच गुण मिळवून सामन्याची सूत्रे आपल्या हाती घेण्याचा प्रयत्न केला. परंतु शिरोडकरच्या कशिश पाटील, मेघ कदमने संयमी खेळ करत सातत्याने गुणांची कमाई करुन विजयाचे पारडे आपल्या संघाच्या बाजूने झुकते ठेवले. सामना संपायला शेवटची तीन मिनिटे बाकी असताना शिरोडकरच्या दोघींनी पुजा यादवची सुरेख पक्कड केली. तिथेच डॉ. शिरोडकर स्पोर्ट्स क्लबचा विजय निश्चित झाला.
त्याअगोदर झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात पुरुष गटात स्वस्तिकने चेंबूर क्रीडा केंद्राचा तर सतेजने शिवशंकर क्रीडा मंडळाचा पराभव केला. महिला विभागात डॉ शिरोडकरने होतकरू मित्र मंडळाचा तर शिवशक्तीने धुळ्याच्या शिवशक्ती महिला संघाचा पराभव केला.
अंतिम दिवसांचा सर्वोत्तम खेळाडूचा मान चेंबूर क्रीडा केंद्राच्या कुणाल पवारला मिळाला.तर चौथ्या दिवसातील सर्वोत्तम खेळाडूचा मान शिवशंकरच्या मंगेश सोनावणेला मिळाला. तसेच महिला विभागात हा मान अनुक्रमे ऐश्वर्या राऊत (होतकरू), विद्या दोलतांडे (शिवशक्ती महिला संघ, धुळे) यांना मिळाला.
स्पर्धेच्या अंतिम दिवशी छत्रपती पुरस्कार प्राप्त सुवर्णा बारटक्के, पुजा यादव, लता पांचाळ ह्यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
स्पर्धेच्या समारोपाच्या दिवशी गणेश नाईक (नामदार), निरंजन डावखरे (आमदार), डॉ. संजय नाईक (माजी खाजदार), संजय वाघुले (ठाणे शहर भाजपा अध्यक्ष), नारायण पवार (माजी नगरसेवक ठामपा) ह्यांनी सदिच्छा भेट दिली. स्पर्धेचा बक्षिस समारंभ अमोल कीर्तिकर (अध्यक्ष, मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशन) यांच्या हस्ते झाला.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष, सुधाकर मोरे, उपाध्यक्ष, सुनील करंजकर , चिटणीस, रमण गोरे, उप चिटणीस, संतोष सुर्वे, सहाय्यक चिटणीस, चिंतामणी पाटील, खजिनदार, रिक्सन फर्नांडीस, विश्वस्त, प्रभाकर सुर्वे, विश्वस्त, कृष्णा डोंगरे, विश्वस्त, पॅट्रिक फर्नांडीस, विशवस्त, केशव मुकणे व नरेंद्र पाठक (सी ई ओ – एस एम एम हायस्कूल) हे देखील उपस्थित होते.
कोळगावच्या मातीतून उमलेले कुस्तीचे दोन तेजस्वी तारे; ओमकारचे सुवर्ण तर स्वराजचे रौप्य झळाळले
स्पर्धेतील पुरस्कार विजेते खेळाडू
महिला गट :
सर्वोत्कृष्ट खेळाडू: कशिश पाटील, सर्वोत्तम पकडपटू : श्रावणी घाडीगांवकर, (दोघी डॉ. शिरोडकर स्पोर्ट्स क्लब, मुंबई शहर), सर्वोत्कृष्ट चढाईपटू : समृद्धी भगत (शिवशक्ती महिला संघ मुंबई शहर)
पुरुष गट :
सर्वोत्तम खेळाडू : अक्षय बर्डे, सर्वोत्तम पक्कडपट्टू : अशोक वीटकर ( दोघे स्वस्तिक क्रीडा मंडळ, मुंबई उपनगर), सर्वोत्तम चढाईपट्टू : पृथ्वीराज शिंदे (सतेज संघ पुणे)
अंतिम विजेता संघाचे फोटो :
स्वस्तिक क्रीडा मंडळ, मुंबई उपनगर (पुरुष गट)
डॉ. शिरोडकर स्पोर्ट्स क्लब, मुंबई शहर(महिला गट)