
मुंबई:
वेळीच निदान आणि प्रभावी (Cancer) उपचाराकरिता मर्क स्पेशॅलिटीजने आज मुंबईतील केजी मित्तल रुग्णालयांच्या सहकार्याने #ActAgainstOralCancer या हॅशटॅगसह “टू-मिनिट अॅक्शन फाँर ओरल कॅन्सर प्रोटेक्शन” मोहीम सुरू केली आहे. तोंडाच्या कर्करोगाच्या प्रकरणांमध्ये चिंताजनक वाढ होत असून स्वयं तपासणीसाठी जागरुक करणे गरजेचे आहे.
तोंडात पांढरे किंवा लाल चट्टे, बरे न होणारे अल्सर किंवा रक्तस्त्राव, सतत सूज येणे किंवा आवाजात बदल होणे यासारख्या लक्षणांकडे दुर्लक्ष करु नका. मौखिक आरशाच्या तपासणीद्वारे लवकर निदान, वेळेवर उपचार आणि प्रतिबंध करता येऊ शकतो. जागरूकतेच्या साधनांमध्ये आरशाचा समावेश करुन केवळ दोन मिनिटांत मौखिक तपासणी करता येऊ शकते.
या उपक्रमाद्वारे, रुग्णालयांना भेट देणारे रुग्ण देखील ही स्वयं-तपासणी करू शकतात. या मोहिमेचे अनावरण करताना सल्लागार वैद्यकीय ऑन्कोलॉजिस्ट डॉ. जेहान धाबर, सल्लागार वैद्यकीय ऑन्कोलॉजिस्ट डॉ. जिमी मिरानी आणि एमडी फिजिशियन आणि पॅलिएटिव्ह केअर तज्ञ डॉ. डेलनाझ जे. धाबर आणि वैद्यकीय कर्मचारी उपस्थित होते.
भारतीयांमध्ये डोकं आणि मानेचा कर्करोग हा सर्वात सामान्य कर्करोग आहे. त्यात तोंडाची पोकळी, ओरोफॅरिन्क्स, हायपोफॅरिन्क्स, नासोफॅरिन्क्स आणि स्वरयंत्रातील कर्करोगांचा समावेश आहे. डोकं आणि मानेच्या कर्करोगाचे रुग्ण सातत्याने वाढत आहेत आणि त्यापैकी तोंडाचा कर्करोग चिंताजनकरित्या वाढत आहे. याचे मुख्य कारण म्हणजे लोकांना लक्षणे माहित नाहीत आणि ते स्वयं तपासणी करत नाहीत. गेल्या काही वर्षांत स्तनाच्या कर्करोगाबद्दल जागरूकता वाढली आहे, विशेषतः स्वयं तपासणीबाबत, तोंडाच्या कर्करोगाच्या बाबतीत मात्र जागरुकतेचा अभाव पहायला मिळतो. जवळजवळ ६५% रुग्ण रोगाच्या प्रगत टप्प्यात डॉक्टरकडे उपचाराकरिता जातात, ज्यामुळे उपचारांना विलंब होतो आणि जगण्याचा दर मंदावतो.
“महिन्यातून एकदा केवळ दोन मिनिटं आरशासमोर उभे राहून मौखिक तपासणी करणे फायदेशीर ठरते. सुरुवातीच्या टप्प्यातील निदान म्हणजे जलद, अधिक प्रभावी उपचार आणि बरे होण्याची शक्यता वाढणे अशी प्रतिक्रिया,” सल्लागार वैद्यकीय ऑन्कोलॉजिस्ट डॉ. जेहान धाबर (बी.एन.डी. ऑन्को सेंटर) यांनी व्यक्त केली.
भारताला जगातील हेड ॲण्ड नेक कर्करोगाची राजधानी म्हणून ओळखले जात आहे. दरवर्षी, सुमारे २ लाख रुग्णांना नव्याने डोकं आणि मानेच्या कर्करोगाचे निदान होते, जे इतर कोणत्याही देशाच्या तुलनेत सर्वाधिक आहे. २०२२ मध्ये, ओठ आणि तोंडाच्या कर्करोगाच्या रुग्णांची संख्या एक लाखांपेक्षा जास्त (६५%) होती. डोकं आणि मानेच्या कर्करोगाच्या वाढती प्रकरणं पाहता ही आपल्या देशातील एकूण पुरुषांमधील कर्करोगाच्या २०-२५% पेक्षा कमी नसावी. दुर्दैवाने,भारतात निदानाच्या वेळी सुमारे ६० ते ७०% रुग्णांना आधीच प्रगत आजाराचे (स्टेज ३-४) निदान होत आहे.
ही मोहीमतंर्गत दर महिन्याला २ मिनिटांच्या साध्या स्वयं मौखिक तपासणीकरिता लोकांना प्रोत्साहित केले जाते कारण वेळीच निदान हाच उत्तम प्रतिबंध आहे. तोंडात पांढरे किंवा लाल चट्टे, २ आठवड्यांत बरे न होणारे अल्सर आणि असामान्य रक्तस्त्राव किंवा हलणारे दात अशा साऱ्या सर्वच बाबींच्या निरीक्षणासाठी आरशात मौखिक पाहणी करणे गरजेचे आहे.
जबडा किंवा मानेमध्ये गाठी किंवा सूज, कर्कशपणा किंवा आवाज बदलणे, कानात किंवा गिळताना सतत वेदना होणे यासारखे बदल जाणवतात. लक्षणे दिसल्यास तातडीने उपचार करा आणि कारण उपचारास विलंब हा जीवघेणा ठरु शकतो. वेळीच तपासणी केल्याने बरे होण्याची शक्यता वाढत असल्याने वेळीच तज्ज्ञांचा सल्ला घ्या, अशी प्रतिक्रिया मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट डॉ. जिमी मिरानी (बी.एन.डी. ऑन्को सेंटर ) सांगतात.
देशात तोंडाच्या कर्करोगाच्या वाढत्या प्रमाणामुळे वेळीच निदान करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. मौखिक तपासणी (OVI), तोंडाची स्वयं तपासणी, बायोप्सी आणि हिस्टो-पॅथॉलॉजिकल तपासणीमुळे सुरुवातीच्या टप्प्यातच निदान शक्य होते, ज्यामुळे वेळीच उपचार करता येतात. तोंडाच्या कर्करोगासंबंधीत काळजीमध्ये वेदना व्यवस्थापन, पोषक आहार, मानसिक समुपदेशन आणि रुग्णाच्या जीवनाची गुणवत्ता सुधारण्यासाठी बोलणे तसेच गिळण्यास सुलभता येण्यासारख्या उपचारांचाही समावेश आहे.
रुग्णांना आणि त्यांच्या कुटुंबियांना सर्वच स्तरावर आधार मिळावा यासाठी पॅलेटिव्ह केअरविषयी जागरूकता आणि उपलब्धता असली पाहिजे,अशी प्रतिक्रिया एमडी फिजिशियन आणि पॅलेटिव्ह केअर तज्ञ डॉ. डेलनाझ जे. धाबर (बी.एन.डी. ऑन्को सेंटर) यांनी व्यक्त केली. तोंडाच्या कर्करोगाच्या प्रकरणांमध्ये होणारी वाढ ही त्वरित जनजागृती, वेळीच निदान आणि प्रतिबंधात्मक कारवाईची तातडीची गरज आहे. तोंडाच्या कर्करोगाची कारणे म्हणजे तंबाखूचा सेवन, अति मद्यपान आणि मानवी पॅपिलोमाव्हायरस (HPV) संसर्ग. उशिरा निदान झाल्यामुळे तोंडाच्या कर्करोगावर उपचार करणे कठीण होते आणि प्रगत टप्प्यात पोहोचल्यास तो टाळता येत नाही.
नियमित स्वयं तपासणीद्वारे वेळीच निदान करणे हे परिणाम सुधारण्यासाठी महत्त्वाचे आहे जे भविष्यातील गुंतागुंत टाळण्यास मदत करते. तोंडाच्या कर्करोगाच्या गुंतागुंतींमध्ये विविध गोष्टींचा समावेश असू शकतो जसे की बोलताना अडचणी येणे, गिळताना आणि श्वास घेण्यात अडचण येणे तसेच जवळच्या ऊतींमध्ये किंवा शरीराच्या इतर भागांमध्ये कर्करोगाच्या प्रसाराचा समावेश असू शकतो. तोंडाच्या कर्करोगापासून स्वतःचे संरक्षण करण्साठी ही अवघ्या दोन-मिनिटांची कृती मोहीम नक्कीच फायदेशीर ठरेल.