
ठाणे :
राजकारणात येणाऱ्या आव्हानांना तेवढ्याच निडरतेने सामोरे जाणाऱ्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी क्रिकेटच्या (TPL) मैदानातही आपण पारंगत असल्याचे दादोजी कोंडदेव स्टेडियमवर दाखवून दिले. निमित्त होते माजी नगरसेवक विकास रेपाळे आणि महाराष्ट्र माझा सेवा संस्था आयोजित १३ व्या उपमुख्यमंत्री चषक ठाणे प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लीलया चेंडू सीमारेषेबाह्रेर पाठवत स्पर्धेचे उदघाटन केले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून खासदार नरेश म्हस्के, यांच्या सह शिव सेना सचिव विलास जोशी, ठाणे विधानसभा क्षेत्र प्रमुख हेमंत पवार,प्रवक्ते राहुल लोंढे उपस्थित होते.
स्पर्धेच्या उदघाटनीय सामन्यात गतविजेत्या अंबरनाथ रायझिंग क्रिकेट क्लबने युनियन क्रिकेट अकॅडमीचा ६७ धावांनी पराभव करत या लीगमध्ये विजयी शुभारंभ केला. सामनावीर ठरलेल्या अनिलकुमार रोंनकी आणि जितेश राऊतच्या नाबाद अर्धशतकामुळे अंबरनाथ रायझिंग क्रिकेट क्लबने २३५ धावांचे आव्हान उभे केले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना युनियन क्रिकेट क्लबला २० षटकात ८ बाद १६६ धावांवर रोखत आपल्या खात्यात पहिला विजय नोंदवला.
प्रथन फलंदाजी करताना अनिलकुमार, जितेश, अद्वैय सिधये आणि शुभम पुण्यार्थीने आक्रमक फलंदाजी करत संघाला द्विशतकी धावसंख्या उभारून दिली. अनिलकुमारने धुवाँधार फलंदाजी करताना ३१ चेंडूत पाच षटकार, सहा चौकार मारताना ६७ धावा केल्या. जितेशने नाबाद ५० धावा बनवताना १७ चेंडूत दोन चौकार आणि सहा षटकार ठोकले. अद्वैयने २१ चेंडूत ४३ आणि शुभमने ३६ धावा केल्या.या डावात अथर्व दिखोळकरने दोन, प्रसाद शिंगोटे, साहिल शेट्टी, धवल खियानीने प्रत्येकी एक बळी मिळवला.
अनमोल यादव आणि रुद्र धांडेचा अपवाद वगळता इतर फलंदाजांनी निराशा केल्याने युनियन क्रिकेट अकॅडमीला पराभव पत्करावा लागला. अनमोलने नवव्या क्रमांकावर फलंदाजीला येत विध्वसंक फलंदाजी केली. अनमोलने ३८ चेंडूत सात चौकार आणि सहा षटकार लगावत नाबाद ७४ धावा केल्या. रुद्रने ३९ धावा केल्या. प्रथमेश महालेने चार आणि मयूर दिवेकरने दोन फलंदाज बाद करत प्रतिस्पर्ध्यांना विजयापासून लांब ठेवले.
Development:महाराष्ट्र राज्याचा 66 वा स्थापना दिन सोहळा शिवाजी पार्क येथे संपन्न
संक्षिप्त धावफलक : अंबरनाथ रायझिंग क्रिकेट क्लब : २० षटकात ५ बाद २३४ ( अनिलकुमार रोंनकी ६७, जितेश राऊत नाबाद ५०, अद्वैय सिधये ४३, शुभम पुन्यार्थी ३६, अथर्व दिखोळकर ४-३२-२, प्रसाद शिंगोटे ३-२८-१, साहिल शेट्टी २-३२-१, धवल खियानी २-२७-१) विजयी विरुद्ध युनियन क्रिकेट क्लब : २० षटकात ८ बाद १६६ ( रुद्र धांडे ३९, अनमोल यादव नाबाद ७४ , प्रथमेश महाले ४-२६-४, मयूर दिवेकर २-९-२, परीक्षित वळसंगकर ४-३४-१). सामनावीर : प्रथमेश महाले.