
मुंबई :
मुंबईतील अतिरिक्त शिक्षकांनी मुंबई बाहेर होणाऱ्या समायोजनास नकार कळवूनही शिक्षण विभागातर्फे मुंबई बाहेर समायोजन झाल्याचे आदेश दिले जात आहेत. तसेच जे शिक्षक ऑर्डर स्वीकारणार नाहीत त्यांचे पुढील महिन्याचे वेतन काढू नये असे स्पष्ट आदेश शिक्षण विभागाने दिले आहेत. या धर्तीवर मुंबईतील शेकडो अतिरिक्त शिक्षकांनी समायोजनाने मुंबईबाहेर जाणार नाही, असा निर्धार शिक्षक भारती कार्यालयात पार पडलेल्या सभेत व्यक्त केला.
समायोजनाने मुंबई बाहेर जाण्यास नकार कळविण्यासाठी २ मे २०२५ रोजी शिक्षण उपसंचालक मुंबई कार्यालय येथे सायंकाळी ४ वाजता मुंबईतील शेकडो शिक्षक जमणार आहेत. अशी माहिती शिक्षक भारती संघटनेचे कार्याध्यक्ष सुभाष मोरे यांनी दिली. शिक्षण विभागाकडून समायोजन स्थगित न केल्यास शिक्षणमंत्री दादा भूसे यांना भेटून मुंबई बाहेर समायोजन करू नये अशी विनंती करणार असे माजी शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी सांगितले. तसेच गरज पडल्यास नगरविकासमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यांच्यासमोर आपली समस्या मांडण्यात येईल, असेही कपिल पाटील यांनी उपस्थित शिक्षकांना सांगितले.
शिक्षण विभागाकडून जबरदस्तीने मुंबई बाहेर समायोजन करण्यात येत आहे. समायोजन न घेतल्यास वेतन थांबविण्याची भीती दाखविली जाते आहे. मुंबईतील शिक्षकांचे समायोजन मुंबईत होऊ शकते पण मग मुंबई बाहेर का जायचे? असा सवाल या सभेत अतिरिक्त शिक्षकांनी केला. अनुदानित शाळा वाचवण्यासाठी मुंबईत शिक्षक टिकवून ठेवणे शासनाची जबाबदारी आहे. मराठी व प्रादेशिक भाषा टिकवण्यासाठी शाळेतील विद्यार्थी संख्या कमी आहे सांगून शिक्षक अतिरिक्त करणे योग्य नाही. शासनाने याबाबत तातडीने कार्यवाही करत समायोजन न थांबवल्यास आंदोलन करण्याचा इशारा शिक्षक भारती संघटनेचे कार्याध्यक्ष सुभाष मोरे यांनी दिला. या बैठकीत आमदार कपिल पाटील, शिक्षक भारतीचे अध्यक्ष अशोक बेलसरे आणि कार्याध्यक्ष सुभाष मोरे यांनी उपस्थित राहून मुंबईतील शेकडो शिक्षकांना मार्गदर्शन केले.