
मुंबई :
मुंबईमध्ये मंगळवारी रात्री ९.३० वाजताच्या सुमारास अचानक सोसाट्याच्या वार व ढगांच्या गडगडाटास जोरदार पाऊस झाला. मुंबईतील घाटकोपर, विक्रोळी, चेंबूर, पवई, भायखळा, वांद्रे, जोगेश्वरी, दादर या भागात जोरदार पाऊस झाला. अचानक झालेल्या या पावसामुळे पूर्व, पश्चिम द्रुतगती मार्गासह, सागरी सेतू व सागरी किनारा महामार्गावर वाहतूक कोंडी झाली. त्याचप्रमाणे शहरात काही ठिकाणी झाडे कोसळण्याच्या घटना घडल्या. रात्री पडलेल्या या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाल्याने नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला.
हवामान खात्याने मुंबई, ठाणे, पालघर परिसरामध्ये मंगळवारी पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविला होता. त्यातच संपूर्ण दिवसभर मुंबईतील वातावरण ढगाळ असल्याने पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली जात होती. मात्र मंगळवारी रात्री ९.३० वाजताच्या सुमारास मुंबई, ठाणे व नवी मुंबईतील विविध ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली. मुंबईमध्ये भायखळा, बोरिवली, जोगेश्वरी, वांद्रे, घाटकोपर, विक्रोळी, पवई परिसरात ढगांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस झाला. त्याचप्रमाणे ठाण्यातही कोपरी येथे जोरदार वाऱ्यांसह पाऊस झाला. नवी मुंबईतील नेरुळ, बेलापूर आणि खारघर परिसरातही जोरदार पावसाने हजेरी लावली. दरम्यान, बुधवारीही मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड भागात गडगडाटासह पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
वाहतुकीवर परिणाम
मुंबईमध्ये मंगळवारी रात्री अचानक झालेल्या पावसामुळे पूर्व व पश्चिम द्रूतगती मार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला. या मार्गावरील वाहतूक संथगतीने सुरू होती. सागरी सेतू, सागरी किनारा मागार्वर वाहतूक कोंडी झाली होती. दहिसरच्या एसव्ही रोड येथे झाड पडल्याने वाहतूक कोंडी झाली होती.
राज्यात पावसाला पोषक वातावरण
अरबी समुद्रात दिड किमी उंचीपर्यंत प्रत्यवर्ती चक्रीय वाऱ्याच्या स्थितीमुळे विदर्भ वगळता संपूर्ण महाराष्ट्रात ताशी ४५ ते ५० किमी वेगाने वाहणाऱ्या आर्द्रतायुक्त उत्तरी वाऱ्यामुळे हा वातावरणीय बदल झाला आहे. राज्यात वादळी पावसाला पोषक वातावरण निर्माण झाल्यामुळे कमाल तापमानात काहीशी घट झाली आहे. उत्तर महाराष्ट्रातही वादळी वाऱ्यासह पाऊस आणि गारपिटीचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे.
या जिल्ह्यांमध्ये होणार पाऊस
सातारा, पुणे, अहिल्यानगर, नाशिक, जळगाव, बीड, जालना आणि छत्रपती संभाजी नगरमध्ये वादळी पाऊस गारपिटीचा इशारा हवामान खात्याने दिला आहे, तसेच मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, वाशिम, बुलढाणा, अकोला आणि अमरावती जिल्ह्यामध्ये वादळी पावसाचा इशारा दिला आहे.