
मुंबई :
बारावीचा निकाल लागल्यानंतर आता दहावीच्या निकालाकडे विद्यार्थी व पालकांचे डोळे लागले आहेत. दहावीचा निकालाबाबत अद्याप राज्य मंडळाकडून कोणतीही तारीख जाहीर करण्यात आली नसली शिक्षण उपसंचालक कार्यालयामार्फत १९ मे पासून अकरावीच्या प्रवेशासाठी ऑनलाईन नोंदणी प्रक्रियेस सुरुवात होणार आहे. तसेच अकरावी प्रवेशप्रक्रिया गुणवत्ताधिष्ठित, पारदर्शक आणि एकसंध असावी, यासाठी शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पासून संपूर्ण राज्यामध्ये उच्च माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांमधील अकरावी प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येणार असल्याचे शालेय शिक्षण विभागाकडून जाहीर करण्यात आले आहे.
दहावीच्या निकालानंतर अकरावी प्रवेश प्रक्रियेसाठी विद्यार्थ्यांची धावपळ सुरू होते. त्यामुळे अकरावी प्रवेश प्रक्रियेसाठी नोंदणी प्रक्रिया शिक्षण उपसंचालक कार्यालयांमार्फत १९ ते २८ मेपर्यंत करता येणार आहे. त्यानंतर राज्यभरातील शासनाने निर्धारित केलेल्या अधिकृत ऑनलाईन पोर्टलवरच्या माध्यमातून महाविद्यालय निवडण्याची मुभा देण्यात येणार आहे. चार प्रवेश फेऱ्या राबविल्यानंतर ‘सर्वांसाठी खुला प्रवेश’ नावाने विशेष फेरी राबविण्यात येणार आहे. या विशेष फेरीमध्ये महाविद्यालयांतील रिक्त जागांवर गुणवत्तेनुसार प्रवेश देण्यात येणार आहे. संपूर्ण प्रवेश प्रक्रिया ही शेवटच्या विद्यार्थ्याला प्रवेश मिळेपर्यंत गुणवत्तेनुसार ऑनलाईन पध्दतीने होणार असून, ऑनलाईन प्रणाली व्यतिरिक्त अन्य प्रणालीमधून एकही प्रवेश शाळा व्यवस्थापनास करता येणार नसल्याचे शालेय शिक्षण विभागाकडून जाहीर करण्यात आले आहे.
अकरावीची प्रवेश प्रक्रिया यापूर्वी मुंबई, पुणे व पिंपरी – चिंचवड, अमरावती महानगरपालिका, नागपूर महानगरपालिका, नाशिक महानगरपालिका आणि छत्रपती संभाजी नगर महानगरपालिका या सहा महानगरपालिका क्षेत्रांमध्ये ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येत होती. मात्र प्रवेश प्रक्रियेत सुसूत्रता, पारदर्शकता आणि गैरप्रकाराला आळा बसावा यासाठी संपूर्ण राज्यामध्ये अकरावीची प्रवेश प्रक्रिया शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पासून ऑनलाईन पद्धतीने राबविण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. त्यानुसार ही प्रवेश प्रक्रिया राबविण्याबाबत शालेय शिक्षण विभागाने मंगळवारी शासन निर्णय काढत मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत.
शिक्षण विभागाकडून प्रत्येक टप्प्यावर प्रक्रिया पारदर्शकपणे राबवली जावी यासाठी विशेष समन्वयक नेमण्यात आले आहेत आणि संबंधित यंत्रणांवर देखरेख ठेवली जाणार आहे. ऑनलाईन पद्धतीतून संपूर्ण प्रक्रिया राबवल्याने विद्यार्थ्यांना आणि पालकांना अधिक सोयीची, विश्वासार्ह आणि स्पष्ट अशी प्रणाली उपलब्ध होणार असल्याचे शालेय शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.
अकरावी प्रवेशासाठी नोंदणी करण्याचे वेळापत्रक
- विद्यार्थ्यांचे ऑनलाईन प्रोफाईल तयार करणे – १९ मे ते २८ मे २०२५
- विद्यार्थ्यांनी प्राधान्यक्रम भरणे – १९ मे ते २८ मे २०२५