क्रीडा

९ व्या सिनियर राज्य अजिंक्यपद कॅरम स्पर्धा १० मेपासून सुरू

मुंबई :

नवी मुंबई स्पोर्ट्स असोसिएशनच्यावतीने तसेच महाराष्ट्र कॅरम असोसिएशन व ठाणे डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशनच्या मान्यतेने नवी मुंबई स्पोर्ट्स असोसिएशन, नवी मुंबई येथे सुरु होत असलेल्या ५९ व्या सिनियर राज्य अजिंक्यपद कॅरम स्पर्धेला १० मे २०२५ रोजी सकाळी ९ वाजता सुरुवात होत आहे.

राज्याचे वनमंत्री गणेश नाईक हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून त्यांच्या शुभहस्ते स्पर्धेचे उदघाटन करण्यात. याप्रसंगी आजी माजी विश्व विजेत्यांसह नुकत्याच शिव छत्रपती पुरस्कार प्राप्त खेळाडूंचा विशेष सत्कार नवी मुंबई स्पोर्ट्स असोसिएशनतर्फे करण्यात येईल अशी माहिती उपाध्यक्ष विजय एस. पाटील यांनी दिली. महाराष्ट्र कॅरम असोसिएशनतर्फे अध्यक्ष जितेंद्र शाह यांच्या हस्ते २०२२-२३ व २०२३-२४ सालासाठी गौरविण्यात आलेल्या शिव छत्रपती पुरस्कार्थींना सन्मानित करण्यात येणार आहे.

वाशीमध्ये प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात राज्य अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन होत असल्याने स्पर्धेला प्रचंड प्रतिसाद लाभला आहे. राज्यभरातून जवळपास ५५० पुरुष व महिला खेळाडू, पंच व पदाधिकारी या स्पर्धेत सहभागी झाली आहेत. यामध्ये संदीप दिवे, योगेश परदेशी, प्रशांत मोरे या आजी माजी विश्व विजेत्या खेळाडूंसहित जवळपास ५० पेक्षाही जास्त आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय व शिव छत्रपती पुरस्कारार्थी खेळाडूंचा समावेश आहे.

नवी मुंबई स्पोर्ट्स असोसिएशनतर्फे स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंना २ लाखांची रोख पारितोषिके, चषक व प्रमाणपत्रे देण्यात येणार आहेत अशी माहिती मानद सचिव विजय आर. पाटील यांनी दिली. महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या युट्युब चॅनलवरून या स्पर्धेचे थेट प्रसारण करण्यात येणार असून मराठी, हिंदी आणि इंग्रजीमधून या सामन्यांचे समालोचन करण्यात येणार आहे. महाराष्ट्र कॅरम असोसिएशन यंदा आपली ७० वे वर्ष साजरे करत असून त्यानिमित्ताने बोर्ड क्रमांक असलेल्या फलकावर आंतर राष्ट्रीय व शिव छत्रपती पुरस्कार प्राप्त खेळाडूंचे छायाचित्र व संक्षिप्त माहिती त्यावर उपलब्ध करण्यात आली आहे.

महाराष्ट्र कॅरम असोसिएशनने तयार केलेल्या विशेष अशा एमसीए कॉइनचा वापर नाणेफेकीसाठी करण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी सुरको कंपनीचे ३२ सुरको किंग कॅरम बोर्ड व सिस्का कंपनीच्या लीजेंड सोंगट्या वापरण्यात येणार आहेत.

स्पर्धेतील मानांकन :

पुरुष एकेरी :

१) सागर वाघमारे ( पुणे ), २) महम्मद घुफ्रान ( मुंबई ), ३) पंकज पवार ( ठाणे ), ४) विकास धारिया ( मुंबई ),५) अनिल मुंढे (पुणे ), ६) प्रशांत मोरे ( मुंबई ), ७) संजय मांडे ( मुंबई ), ८) रिझवान शेख ( मुंबई उपनगर )

महिला एकेरी :

१) समृद्धी घाडीगावकर ( ठाणे ), २) आकांक्षा कदम ( रत्नागिरी ), ३) प्राजक्ता नारायणकर ( मुंबई उपनगर ), ४) मधुरा देवळे ( ठाणे ), ५) रिंकी कुमारी ( मुंबई ), ६) मिताली पाठक ( मुंबई ), ८) केशर निर्गुण ( सिंधुदुर्ग )

पुरुष वयस्कर एकेरी :

१) बाबुलाल श्रीमाळी ( मुंबई ), २) शब्बीर खान ( मुंबई उपनगर ), ३) सत्यनारायण दोंतुल ( मुंबई ), ४) गिरीधर भोज ( मुंबई उपनगर )

महिला वयस्कर एकेरी :

१) मीनल लेले खरे ( ठाणे ), २) माधुरी तायशेटे ( मुंबई उपनगर ), ३) शोभा कामात ( कोल्हापूर ), ४) जयमाला परब ( मुंबई उपनगर)

पुरुष सांघिक गट : १) पुणे, २) मुंबई, ३) मुंबई उपनगर, ४) ठाणे

महिला सांघिक गट : १) मुंबई, २) ठाणे, ३) पुणे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *