
मुंबई
५१५० भाडेतत्त्वावरील इलेक्ट्रिक बस पुरवठा करण्यात संबंधित कंपनी निष्क्रिय ठरली असून या कंपनीसोबत एसटी महामंडळाने केलेला निविदा करार रद्द करण्याबाबत कारवाई करावी असे निर्देश परिवहन मंत्री तथा एस टी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिले . ते आज महामंडळाच्या मुख्यालयात बोलावलेल्या आढावा बैठकीमध्ये बोलत होते. दरम्यान इलेक्ट्रिक बसचा पुरवठा करण्यात कंत्राटदाराकडून विलंब होत असल्याबद्दल महाराष्ट्र एस. टी. कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बारगे यांनी पाठपुरावा केला होता.
मंत्री सरनाईक म्हणाले, २२ मे पर्यंत संबंधित बस पुरवठादार संस्थेला १ हजार बसेस पुरवठा करण्याचे सुधारित वेळापत्रक दिले होते. परंतु या कालावधीपर्यंत एकही बस संबंधित कंपनीला पुरविणे शक्य झाले नाही. त्यामुळे भविष्यात या संस्थेकडून बसेस पुरवठा करण्याबाबत साशंकता आहे. सध्या महामंडळाला बसण्याची अत्यंत आवश्यकता असताना संबंधित संस्था जर वेळेत बस पुरवठा करू शकत नसेल तर या कंपनी सोबत केलेला निविदा करार रद्द करावा.
शिवशाही बसेस चे रुपांतर हिरकणी मध्ये
सध्या एसटी महामंडळाकडे चालनात असलेल्या शिवशाही बसेसची टप्प्या टप्प्याने पुनर्बांधणी करून त्याचे रूपांतर हिरकणी (निम आराम)बसेस मध्ये करण्यात यावे. तसेच त्या बसेस पूर्वीप्रमाणे हिरव्या पांढऱ्या रंगातच असाव्यात असे निर्देश मंत्री सरनाईक यांनी यावेळी दिले.
स्वच्छतेबाबत तडजोड नाही
मंत्री म्हणून राज्यातील विविध बसस्थानकाला भेट दिली असता, स्वच्छतेबाबत प्रचंड अनास्था दिसून आली. या संदर्भात प्रवाशांच्या विशेषतः महिला प्रवाशांच्या वारंवार तक्रारी येत आहेत. त्रुटी दाखवून दिल्यानंतर संबंधितांवर जबाबदारी निश्चित करुन कारवाई करणे अपेक्षित असताना अशा अधिकाऱ्यांना पाठिशी घातले जात असेल तर ते कदापि सहन केले जाणार नाही.असा सज्जड दम या वेळी मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिला.