शिक्षण

एससीईआरटीच्या ढिसाळ नियोजनामुळे शिक्षक प्रशिक्षणाचे वाजले बारा

मुंबई : 

सरकारी सेवेची १२ आणि २४ वर्षे पूर्ण झालेल्या शिक्षकांना पुढील श्रेणी मिळण्यासाठी आवश्यक असलेल्या वरिष्ठ वेतनश्रेणी आणि निवडश्रेणी प्रशिक्षणादरम्यान प्रचंड गोंधळ झाल्याने राज्यभरातील प्रशिक्षणाचा बोजवारा उडाल्याचे चित्र सोमवारी दिसले. त्याशिवाय प्रशिक्षणाची हजेरी आणि मूल्यमापन यासाठी दिलेल्या ऑनलाइन प्रक्रियेतही तांत्रिक बिघाड होता. परिणामी शिक्षकांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे.

सरकारी नोकरीतील शिक्षकांनी १२ वर्षांचा कालावधी पूर्ण केल्यावर त्यांना वरिष्ठ वेतनश्रेणी लागू होते. तसेच २४ वर्षे नोकरी केल्यावर त्यांना निवडश्रेणी दिली जाते. मात्र या दोन्ही श्रेणींसाठी शिक्षकांना एससीईआरटीचे प्रशिक्षण पूर्ण करणे आवश्यक असते. या प्रशिक्षणाचे आयोजन एससीईआरटीने यंदा २ जून रोजी केले होते. यंदा हे प्रशिक्षण राज्यभरात ऑफलाइन पद्धतीने आयोजित करण्यात आले आणि त्यासाठी २ हजार रुपये शुल्कही शिक्षकांकडून घेण्यात आले.

प्रशिक्षणादरम्यान पाच-दहा मिनिटांचा विलंब झाला, तरी शिक्षकांना गैरहजर किंवा अनुपस्थित शेरा दिला जात होता. त्याचप्रमाणे मार्गदर्शक सूचनांनुसार एका वर्गात ४० शिक्षकांचे प्रशिक्षण होणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात ७० ते ८० शिक्षकांना एका वर्गात प्रशिक्षण दिले जात होते. त्याशिवाय प्रशिक्षणादरम्यान प्रत्येक सत्रानंतर ऑनलाइन पद्धतीने घेतल्या जाणाऱ्या मूल्यमापन चाचणीसाठीची ऑनलाइन लिंक सुरूच होत नव्हती. त्यात तांत्रिक बिघाड झाल्याने शिक्षकांचा जीव खालीवर होत होता. या मूल्यमापन चाचण्यांच्या गुणांवर प्रशिक्षणाचा निकाल अवलंबून असल्याने शिक्षकांचा जीव कासावीस झाला होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *