
मुंबई :
अंधेरी (पूर्व) येथील औद्योगिक वसाहतीमधील ईएसआयएसचे कामगार रुग्णालय महत्वाचे असून, हे रुग्णालय सर्व सुविधेसह तातडीने लोकांच्या सेवेत उपलब्ध करावे असे सक्त निर्देश आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी रुग्णालय प्रशासनाला दिले आहेत. कामगार रुग्णालयाच्या संबंधित प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी लवकरच नगरविकास, उद्योग, कामगार व आरोग्य विभागाची संयुक्त बैठक आयोजित करण्यात येणार असून, यासंदर्भात लवकरच केंद्रीय मंत्री व सचिव यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
अंधेरी (पूर्व) येथील औद्योगिक वसाहतीमधील ईएसआयएस कामगार रुग्णालयास २०१८ मध्ये आग लागली होती. त्यानंतर रुग्णालयातील आरोग्यसेवा बंद करण्यात आल्या होत्या. या रुग्णालयाचे बांधकाम पूर्ण झाले असून, सध्या रुग्णालयात केवळ बाह्यरुग्ण सुविधा दिली जाते. त्यामुळे कामगार व स्थानिक रुग्णांची गैरसोय होत आहे. आंतररुग सुविधेसह पूर्ण क्षमतेने रुग्णालय सुरु करण्याची स्थानिक नागरिकांची मागणी आहे. स्थानिक आमदार मुरजी पटेल, डॉ. मनीषा कायंदे यांनी याबाबत विधानसभेत प्रश्न उपस्थित केला होता. त्या अनुषंगाने आरोग्यमंत्र्यांनी गेल्या महिन्यात मुंबईत विशेष बैठक आयोजित करून अंधेरी ईएसआयएस रुग्णालयातील प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले होते. तसेच रुग्णालयाला प्रत्यक्ष भेट देवून पाहणी करणार असल्याचे सांगितले होते.
त्यानुसार मंगळवारी आरोग्यमंत्र्यांनी स्थानिक आमदार मुरजी पटेल यांचेसह कामगार रुग्णालयाला भेट दिली. यावेळी मंत्र्यांनी रुग्णालयाच्या बांधकामाची, तसेच विविध विभागांची पाहणी केली. यावेळी आयोजित बैठकीत आरोग्य मंत्र्यांनी रुग्णालय प्रशासनाच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली. सर्व सुविधासह रुग्णालय सुरु होण्यास विलंब झाला असून, याप्रश्नी जबाबदारी निश्चित करून कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. कामचुकारपणा करणाऱ्याच्या बदल्या करण्याचे तसेच डॉक्टर भाग्यलक्ष्मी श्रीवास्तव यांचे कार्यपद्धतीबाबत तक्रारी आल्याने त्यांची चौकशी करून, कारवाई करण्याचे निर्देश क्षेत्रीय संचालक अभिलाषा झा यांना दिले. मुंबईतील सामन्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्वाच्या या रुग्णालयात नागरिकांना लवकरात लवकर व उत्तम दर्जाच्या आरोग्य सुविधा मिळाल्या पाहिजेत यासाठी आग्रही असून, या रुग्णालयाच्या प्रश्नाबाबत केंद्रीय मंत्री व सचिवांची भेट घेणार असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.