शिक्षण

महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाचे प्रथमच होणार कोकणात राज्यस्तरीय अधिवेशन

देवरुख :

महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाचे ३६ वे राज्यस्तरीय एकदिवसीय अधिवेशन १५ जून २०२५ रोजी देवरुख येथील आठल्ये-सप्रे-शितोळे महाविद्यालयात पार पडणार आहे. कोकण विभागात प्रथमच होणाऱ्या या अधिवेशनाचे आयोजन देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाने केले आहे. या अधिवेशनाचे उद्घाटन राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, आणि महामंडळाच्या अध्यक्षा खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.

शिक्षण संस्थांच्या संघटनेला बळ देऊन संस्थांच्या अडचणी शासन दरबारी मांडणे, व शैक्षणिक गुणवत्तेत वाढ साधणे, हे या अधिवेशनाचे मुख्य उद्दिष्ट आहे. यावेळी शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होणार आहे. तसेच, मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानंतर तिच्या प्रचार-प्रसारासाठी जागृती निर्माण करणे हाही चर्चेचा भाग असणार आहे. सदर राज्यस्तरीय अधिवेशनास मुंबई व ठाणे विभागातील सर्व शिक्षण संस्था चालकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाचे मुंबई विभागीय अध्यक्ष डॉ. विनय राऊत यांनी केले आहे.

काही महत्वाचे मुद्दे पुढीलप्रमाणे –

  • ग्रामीण, डोंगरी, आदिवासी भागातील २० पेक्षा कमी विद्यार्थ्यांची शाळा बंद होऊ नयेत यासाठी संचमान्यतेचे धोरण शिथिल करण्याची मागणी.
  • कर्मचारी भरतीचा अधिकार शिक्षण संस्थांना देणे
  • वेतनेतर अनुदान थकबाकी सातव्या वेतन आयोगाप्रमाणे मिळणे.
  • टप्पा अनुदानित शाळांना १००% वेतन व वेतनेत्तर अनुदान देणे.
  • शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या अधिकृत करणे.
  • २००१ पासून मान्यता मिळालेल्या महाविद्यालयांना अनुदान देणे.
  • ग्रामीण भागातील इयत्ता ११ वी प्रवेशप्रक्रिया ऑफलाइन पद्धतीने राबवणे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *