आरोग्य

रोबोटिक शस्त्रक्रियेत जे.जे. रुग्णालयाचे अर्धशतक

मुंबई : 

जे.जे. रुग्णालयात रोबोटिक शस्त्रक्रियेला सुरुवात झाल्यापासून अवघ्या दोन महिन्यांमध्ये शस्त्रक्रिया विभागाने रोबोटिक शस्त्रक्रियेचे अर्धशतक पूर्ण केले. १२ जून रोजी आसाममधील ५१ वर्षीय महिलेच्या पित्ताशयावर जे.जे. रुग्णालयातील डॉक्टरांनी यशस्वी रोबोटिक शस्त्रक्रिया केली. यामुळे जे.जे. रुग्णालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

सर्वसामान्यांना अद्ययावत आणि आधुनिक उपचार रुग्णांना पुरविण्याच्या दृष्टीने जे. जे. रुग्णालय नेहमीच प्रयत्नशील राहिले आहे. जे. जे. रुग्णालयात दोन महिन्यांपूर्वी म्हणजे ९ एप्रिल २०२५ रोजी राेबोटिक शस्त्रक्रियेचा श्रीगणेशा करण्यात आला. यावेळी तीन रुग्णांवर डॉक्टरांनी यशस्वी रोबोटिक शस्त्रक्रिया केली. त्यानंतर अवघ्या दोन महिन्यांतच जे.जे. रुग्णालयाच्या शस्त्रक्रिया विभागाने ५० रोबोटिक शस्त्रक्रियांचा टप्पा पार केला आहे. १२ जून २०२५ रोजी आसाममधून उपचारासाठी आलेल्या ५१ वर्षीय महिलेवर ही यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. आसाममधील या ५१ वर्षीय महिलेला तीन महिन्यांपासून सातत्याने पोटात दुखत होते. अनेक उपचार करूनही तिला आराम मिळत नव्हता. अखेर काही दिवसांपूर्वी ती जे.जे. रुग्णालयामध्ये उपचारासाठी आली. यावेळी तिच्या विविध तपासण्या करण्यात आल्या. तपासणीदरम्यान तिला पोर्सिलेन पित्ताशयाचे निदान झाले. यामुळे तिला पित्ताशायचा कर्करोग होण्याची शक्यता निर्माण झाली होती. त्यामुळे डॉक्टरांनी तातडीने शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार या महिलेवर कोलेसिस्टेक्टॉमी ही अवघड शस्त्रक्रिया रोबोटिकच्या माध्यमातून करण्यात आली. शस्त्रक्रियेदरम्यान तिच्या पित्ताशयामध्ये दाट चिकटपणा आढळला. मात्र रोबोटिक शस्त्रक्रियेमुळे येणाऱ्या अचूकतेमुळे आणि सुधारित थ्री डी व्हिज्युअलायझेशनमुळे या महिलेवर प्रभावीपणे शस्त्रकिया करण्यात आली असल्याची माहिती जे. जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय भंडारवार यांनी दिली.

जे.जे.रुग्णालयातील ५० वी रोबोटिक शस्त्रक्रिया रुग्णालयाचे अधिष्ठाता व शस्त्रक्रिया विभागाचे प्रमुख प्रा. डॉ.अजय भंडारवार यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. गिरीश बख्शी, डॉ. अमोल वाघ, डॉ. चंद्रकांत साबळे, डॉ. काशिफ अन्सारी आणि डॉ. सुप्रिया भोंडवे यांनी शस्त्रक्रिया यशस्वी केली. या शस्त्रक्रियेमध्ये भूलतज्ज्ञ डॉ. डॉ. उषा बडोले, डॉ. भरत शाह आणि डॉ. अश्विनी सोनटक्के यांच्या तुकडीने सहकार्य केले. जे.जे. रुग्णालयामध्ये ५० वी यशस्वी रोबोटिक शस्त्रक्रिया यातून तंत्रज्ञान आणि रुग्णांना जागतिक दर्जाची सोयीसुविधा पुरविण्याबाबत शस्त्रक्रिया विभागाची वचनबद्धता दिसून येते.

केक कापून साजरा केला आनंद

जे.जे. रुग्णालयात ५० वी रोबोटिक शस्त्रक्रिया पूर्ण करण्यात आल्यानंतर शस्त्रक्रिया विभाग आणि भूलतज्ज्ञ विभागातील डॉक्टरांनी केक कापून आनंद साजरा केला. यावेळी रुग्णालयाचे शस्त्रक्रिया यशस्वी करणाऱ्या डॉक्टरांच्या टीमसोबत अधिष्ठाता व शस्त्रक्रिया विभागाचे प्रमुख प्रा. डॉ.अजय भंडारवार हेही उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *