
मुंबई :
क्रॉफर्ट मार्केट परिसरात राहत असलेल्या एका ४० वर्षीय अविवाहित तरुणीच्या पोटातून तब्बल १० किलो ४०० ग्रॅम वजनाचा गोळा काढण्यात सेंट जॉर्जेस रुग्णालयातील डॉक्टरांना यश आले. संपूर्ण पोटामध्ये पसरलेल्या या गोळ्यामुळे या तरुणीच्या पोटातील आतडे, फुफ्फुस, यकृत, हृदय, मूत्रपिंड आणि रक्तवाहिन्यांवर दाब पडत होता. त्यामुळे गुंतागुंतीची बनलेली ही शस्त्रक्रिया डॉक्टरांनी यशस्वीपणे पार पडल्याने या तरुणीला जीवदान मिळाले आहे.
कॉफर्ट मार्केट येथील सीताराब इमारत परिसरात राहत असलेली मीना सोलंकी (४०) हिच्या पोटाला दीड वर्षापूर्वी एका टेबलचा कोपरा लागला होता. त्यामुळे तिला पोटात दुखू लागले होते. मात्र स्थानिक डॉक्टरांकडे उपचारासाठी गेल्यावर त्यांनी दिलेल्या औषधामुळे तिला काही काळ आराम मिळत होता. मात्र हळूहळू तिच्या पोटात अधिकच दुखू लागले. तसेच तिच्या पोटाचा आकारही वाढू लागले. यामुळे तिला मासिक पाळीचाही त्रास सुरू झाला. दिवसेंदिवस पोट वाढत होते. अविवाहित असतानाही गरोदर असल्यासारखे पोट वाढत असल्याने ती प्रचंड तणावाखाली आली होती. मात्र तिने स्थानिक डॉक्टरांकडेच उपचार सुरू ठेवले होते. काही महिन्यांपासून तिला काहीही खाल्ल्यावर त्रास सुरू झाला. मे महिन्यामध्ये तिला तोंड आल्याने तिला काहीही खाणे अशक्य झाले. त्यामुळे तिचे जेवण बंद झाले. त्यानंतर सलग आठ दिवस तिला उलट्यांचा त्रास सुरू झाला. ती दिवसेंदिवस अशक्त होऊ लागली होती. अखेर एका समाजसेवकांच्या मदतीने तिच्या भावाने तिला सेंट जॉर्जेस रुग्णालयात उपचारासाठी आणले. उपचारादरम्यान तिच्या विविध तपासण्या केल्या असता तिच्या पोटामध्ये भला मोठा मासांचा गाेळा असून, त्याने पोटात व्यापलेल्या जागेमुळे पोटातील आतडे, फुफ्फुस, यकृत, हृदय, मूत्रपिंड आणि रक्तवाहिन्यांवर प्रचंड दाब पडला होता. त्याने पोटात इतकी जागा व्यापली हेाती की तो पोटातील अवयवांना चिकटला होता. तसेच मासांचा हा गोळा फुटण्याची शक्यता निर्माण झाल्याने शस्त्रक्रिया करणे फारच गुंतागुंतीचे झाले होते. शस्त्रक्रियेदरम्यान महिलेचा जीव जाण्याची शक्यता होती. मात्र सेंट जॉर्जेस रुग्णालयातील स्त्री रोग तज्ज्ञ डॉ. राजश्री कटके यांनी आपल्या अनुभवाच्या जोरावर ही शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली. तब्बल चार तास चालेल्या या शस्त्रक्रियेतून डॉ. राजश्री कटके यांनी तब्बल १० किलो ४०० ग्रॅम वजनाचा गोळा पोटातून काढला. या शस्त्रक्रियेमध्ये त्यांना ऑन्काेसर्जन डॉ. कोरेश, डॉ. शुभांगी आणि भूलतज्ज्ञ डॉ. पौर्णिमा सोनकांबळे आणि डॉ. रूची यांनी मदत केली.
शस्त्रक्रियेनंतर दोन दिवस या तरुणीला अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले होते. त्यानंतर हळूहळू तिच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर तिला प्रथिनयुक्त आहार देण्यास सुरुवात करण्यात आली असून, ती आता जेवण जेऊ लागली आहे. तसेच रुग्ण कक्षामध्ये ती फिरू लागली आहे.
डॉक्टर देव नाहीत, पण देवापेक्षा कमी नाहीत. ती जगेल असा आम्हाला विश्वास नव्हता. मात्र मरणाच्या दारात असलेल्या माझ्या बहिणीला डॉक्टरांनी जीवदान दिले आहे. त्यामुळे सेंट जॉर्जेस रुग्णालयातील डॉक्टरांचे आम्ही आभारी आहोत.
– रमेश सोलंकी, रुग्ण मीनाचा भाऊ
रुग्णाला सततची पोटदुखी, श्वास घेण्यास होत असलेला त्रास यामुळे शस्त्रक्रिया अतिशय गुंतागुंतीची आणि जटील होती. रुग्णाची शस्त्रक्रियेची मानसिकता नसल्याने प्रथम तिचे समुपदेशन करून तिच्या नातेवाईकांना शस्त्रक्रियेचील कल्पना दिली. जटील शस्त्रक्रिया करण्याच्या अनुभवामुळेच ही शस्त्रक्रिया व्यवस्थित करणे शक्य झाले. वैद्यकीय पथकाच्या सहकाऱ्याने ही शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात यश आले.
– डाॅ. राजश्री कटके, प्राध्यापक व स्त्री रोग तज्ज्ञ, सेंट जॉर्जेस रुग्णालय