
मुंबई :
पीओपीच्या गणेश मूर्ती संदर्भात निर्णय आल्यानंतर मुंबईतील सर्वच गणेशोत्सव मंडळ आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनासाठी सज्ज झाली आहेत. दरवर्षी आपल्या भव्यदिव्य २२ फूट उंच मूर्तीसाठी प्रसिद्ध असलेल्या ‘मुंबईचा राजा’ अशी ख्याती असलेल्या लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळाची मूर्ती घडवण्याची संधी यावर्षी एका नवीन मूर्तिकाराच्या हाती लागली आहे. यंदाच्या वर्षी मुंबईतील प्रसिद्ध मूर्तिकार आकाश तिरमल हा तरुण मूर्तीकर मुंबईच्या राजाची मूर्ती घडवणार आहे.
मुंबईचा राजा म्हटले की गणेश गल्लीचा गणपती सर्वसामान्य भाविकांच्या नजरेसमोर येतो. या मंडळातर्फे साकारण्यात येणारा देखावा पाहण्यासाठी जशी भाविक गर्दी करतात. तशीच मुंबईच्या राजाची मनमोहन व आकर्षक मूर्तीच्या दर्शनासाठी भाविक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. या अगोदर अनेक नामांकित मूर्तिकरांनी मुंबईचा राजाची मूर्ती घडवली आहे. दीनानाथ वेलिंग यांनी सुरु केलेला वारसा त्यांच्या निधनानंतर मंडळांनी जपला आहे. यामध्ये मूर्तिकार मनोहर बागवे, सतीश वळिवडेकर, विजय खातू अशा अनेक दिग्गज मूर्तिकारांना मंडळाने संधी दिलेली आहे. यंदाच्या वर्षी मंडळाने एका तरुण मूर्तिकाराला ही संधी देण्याचा निर्णय घेतलेला आहे असे मंडळाचे सचिव स्वप्नील परब यांनी सांगितले.