
मुंबई :
तांत्रिक अडचणींमुळे लांबणीवर गेलेल्या अकरावी प्रवेश प्रक्रियेचे सुधारित वेळापत्रक आज रात्री उशिरा जाहीर करण्यात आले. सुधारित वेळापत्रकानुसार अकरावी प्रवेशाची कोट्यातील प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी ३० जून रोजी जाहीर करण्यात येणार आहे. या यादीत प्रवेश मिळणाऱ्या विद्यार्थ्यांना ७ जुलै पर्यंत प्रवेश घेता येणार आहे.
शैक्षणिक सत्र २०२५-२६ मधील अकरावी प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पध्दतीने करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यावर्षी संपूर्ण राज्यात अकरावी ऑनलाईन प्रवेश सर्वप्रथम करण्यात येत आहेत. यापूर्वी जाहीर करण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार २६ जून रोजी पहिली गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येणार होती. मात्र अल्पसंख्यांक कोट्यातील प्रवेशबाबत न्यायालयाने दिलेल्या आदेशामुळे प्रवेशाच्या संगणक प्रणालीमध्ये बदल करण्याची प्रक्रिया राबविण्यात आल्याने प्रवेश प्रक्रिया लांबणीवर गेली. सुधारित वेळापत्रकानुसार ३० जून रोजी प्रथम यादी जाहीर करण्यात येणार असून यामध्ये कोटा अंतर्गत असलेल्या इन हाऊस, व्यवस्थापन व अल्प संख्यांक कोट्यातील प्रवेश जाहीर करण्यात येणार आहेत. तर या यादीत प्रवेश प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना १ ते ७ जुलै पर्यंत प्रवेश घ्यावा लागणार आहे. तर ९ जुलै रोजी दुसऱ्या फेरीसाठी रिक्त जागा प्रदर्शित करण्यात येणार आहेत. मात्र नियमित फेरीचे वेळापत्रक अद्याप शिक्षण संचालयाने जाहीर केलेले नाही.
हेही वाचा : Polytechnic : पदविका अभ्यासक्रमासाठी अर्ज भरण्यास ३० जूनपर्यंत मुदतवाढ, नवीन वेळापत्रक जाहीर
दरम्यान माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाने जाहीर केलेल्या सुधारित वेळापत्रकानुसार गुरुवारी अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची पहिली गुणवत्ता यादी जाहीर होणे अपेक्षित होते. त्यामुळे गुरुवारी दुपारी ३ वाजल्यापासून विद्यार्थी संकेतस्थळाला भेट देत होते. पण गुणवत्ता यादीचा पत्ताच नव्हता. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण पसरले होते.