
मुंबई :
अकरावी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना अपार आयडी असणे बंधनकारक आहे. त्यानुसार राज्य मंडळातील सर्व विद्यार्थ्यांचे अपार आयडी काढण्यात आले असले तरी सीबीएसई, आयसीएसई, आयबी या मंडळातील अनेक विद्यार्थ्यांचे अपार आयडीच नाहीत. त्यामुळे कनिष्ठ महाविद्यालयांकडून अपार आडी नसलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारण्यात येत होते. त्यामुळे या विद्यार्थ्यांनी शिक्षण संचालनालयाकडे धाव घेतल्यावर यासंदर्भात तातडीने बैठक घेऊन अन्य मंडळाच्या विद्यार्थ्यांकडे अपार आयडी नसेल तर त्यांना प्रवेश नाकारू नये, तसेच त्या विद्यार्थ्यांचे अपार आयडी काढण्याच्या सूचना कनिष्ठ महाविद्यालयांना देण्यात आल्या आहेत.
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीची माहिती सहज उपलब्ध व्हावी यासाठी केंद्र सरकारकडून सर्व विद्यार्थ्यांचे शालेय पातळीवर ऑटोमेटेड पर्मनंट अकॅडमिक अकाउंट रजिस्ट्री म्हणजेच अपार आयडी तयार करणे बंधनकारक केले आहे. राज्य शिक्षण मंडळाच्या शाळांमध्ये अपार आयडी परीक्षेसाठी आवश्यक असल्याने प्रत्येक विद्यार्थ्याच्या नावे अपार आयडी तयार करण्यात आला आहे. मात्र अन्य मंडळाच्या शाळांमध्ये अनेक विद्यार्थ्यांनी अपार आयडी काढलेले नाहीत. त्यामुळे सोमवारपासून सुरू झालेल्या अकरावी प्रवेशाच्या पहिल्या फेरीमध्ये प्रवेश मिळालेल्या अन्य मंडळाच्या अनेक विद्यार्थ्यांना कनिष्ठ महाविद्यालयाकडून प्रवेश नाकारण्यात आले. प्रवेश नाकारण्यात आल्याने चांगल्या महाविद्यालयातील प्रवेशाची संधी वाया जाण्याची भीती निर्माण झाल्याने सीबीएसई, आयसीएसई, आयबी मंडळाच्या विद्यार्थ्यांनी शिक्षण संचालनालयाकडे धाव घेतली. विद्यार्थ्यांची अडचण लक्षात घेत माध्यमिक व उच्च माध्यमिक संचालक डॉ. महेश पालकर यांनी सर्व संबंधितांची तातडीची बैठक बोलावली. या बैठकीमध्ये अपार आयडीची अट काढून टाकण्याचा निर्णय घेत अपार आयडीशिवाय विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात यावेत. तसेच प्रवेश झाल्यानंतर अपार आयडी काढण्याची मुभा विद्यार्थ्यांना देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे आता अपार आयडीशिवायच अकरावीला प्रवेश मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
विद्यार्थ्यांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही याची काळजी घेत आहोत. अपार आयडी काढण्यासाठी जेमतेम १५ ते २० मिनिटांचा कालावधी लागतो. त्यामुळे विद्यार्थ्याला प्रवेश मिळालेल्या संबंधित महाविद्यालयांना अपार आयडी काढून देण्याबाबतच्या सूचना महाविद्यालयांना पत्राद्वारे कळविण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रथम विद्यर्थ्यांना प्रवेश देण्यात येईल, त्यानंतर त्यांचे अपार कार्ड काढण्यात येईल.
– डॉ. महेश पालकर, संचालक, माध्यमिक व उच्च माध्यमिक