
मुंबई :
बोधिवृक्ष फाऊंडेशन निर्मित उदय जाधव लिखित, दिग्दर्शित “देवानंपिय असोक” या नाटकाचा २५ वा रौप्यमहोत्सवी प्रयोग रविवार, दिनांक २९ जून २०२५ रोजी, रात्री ८ वाजता पु. ल. देशपांडे अकादमी, रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी, मुंबई या ठिकाणी उत्साहात संपन्न झाला. या निमित्ताने रत्नागिरी जिल्ह्यातील, तालुक्यातील करबुडे गावचे कोकण सुपुत्र तथा मराठी नाट्य क्षेत्रातील सुप्रसिद्ध नाट्य लेखक, दिग्दर्शक उदय जाधव लिखित “गार्गी आणि इतर एकांकिका” या पुस्तकाचे प्रकाशन सोहळा प्रमुख पाहुणे कवी, नाटककार अजय कांडर, नाट्य – सिने अभिनेते संदेश जाधव, संदीप गायकवाड, सुनील जाधव, प्रितेश मांजलकर सुप्रसिद्ध अभिनेत्री मेघा घाडगे, केतकी नारायण, दिपश्री माळी आणि बुक स्टार प्रकाशकचे अस्मिता चांदणे, दीपक चांदणे यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी “देवानंपिय असोक” या नाटकातील कलाकार, तंत्रज्ञ यांना सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
उदय जाधव हे मराठी रंगभूमीवरील लक्षवेधी तरुण दिग्दर्शकांपैकी एक महत्त्वाचं नाव असून त्यांचे “देवानंपिय असोक” हे आपल्या मूळ परंपरेचा शोध घेणारे वेगळे नाटक बहुचर्चित ठरले आहे. सम्राट अशोकाच्या विषयावर, अभिव्यक्ती आणि कलात्मक स्वातंत्र्याचा गैरफायदा न घेता. इतिहासाशी प्रतारणा न करता तो वास्तववादी रंगभूमीवर नाटक रूपाने मांडणं. हे एक मोठे आव्हान होते. हे आव्हान उदय जाधव यांनी यशस्वीरित्या पेलले आहे. ज्येष्ठ साहित्यिक अजय कांडर म्हणाले कि, मराठी रंगभूमीवरील आजचे तरुण अभ्यासू रंगकर्मी विचार शीलतेने नाटक करताना दिसतायत. एका बाजूला प्रचंड हौशीने गावोगावी रंगभूमी विषयक काम चालू आहे. तर दुसऱ्या बाजूला स्वतःची पेस शोधत नवीन नाटक घडविणारी एक पिढी उदयास आली आहे. यातीलच एक नाव लेखक दिग्दर्शक उदय जाधव. “गार्गी आणि इतर एकांकिका” संग्रहातूनं या आघाडीच्या लेखकाने मानवी नात्यांवर सहज सुंदर भाष्य केले आहे. या एकांकिकांचे प्रयोग तरुण रंगकर्मी आवर्जून करतील यात शंका नाही.
हेही वाचा : ITI Admission : आयटीआयला नव्वदी पार ५६७ गुणवंत विद्यार्थ्यांची पसंती
सुप्रसिध्द नाट्य – सिने अभिनेते संदेश जाधव म्हणाले कि, उदय जाधव यांच्या “गार्गी आणि इतर एकांकिका” हे पुस्तक प्रकाशन झालंय मला वाचायला खूप आवडेल. उदयच्या एकांकिका पाहिल्या आहेत. आता वाचनासाठी वेगळा आनंद घेता येईल. उदयला आणि सर्व टीमला मनःपूर्वक शुभेच्छा! नाट्य लेखक, दिग्दर्शक आबा पेडणेकर शुभेच्छा देताना म्हणाले भरभरून लेखन होऊ दे. नाट्य लेखक, दिग्दर्शक उदय जाधव म्हणाले कि, “देवानंपिय असोक” या नाटकाला इतकं प्रेम मिळतंय, फार आनंद होतोय, छान वाटतय. इतर प्रयोगावेळी आवर्जून उपस्थित रहा असे आवाहन केले. तसेच “गार्गी आणि इतर एकांकिका” हे पुस्तक वाचक म्हणून अभ्यासावे आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करावा. “गार्गी आणि इतर एकांकिका” प्रकाशित झाल्यामुळे आनंद होत असल्याचे म्हटले. यावेळी मान्यवर, शुभेच्छुक, हितचिंतक, नाट्य रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.