शिक्षण

Agriculture course : कृषी अभ्यासक्रमाचे वेळापत्रक जाहीर, ४ जुलैपासून अर्ज नोंदणीला सुरुवात

मुंबई :

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाद्वारे एमएचटी सीईटीच्या गुणांच्या आधारे प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येत असलेल्या कृषी अभ्यासक्रमाच्या पदवी प्रवेश प्रक्रियेला ४ जुलै रोजी सुरूवात होत आहे. कृषी अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेची अंतरिम गुणवत्ता यादी २१ जुलै तर पहिल्या फेरीसाठी गुणवत्ता यादी ३० जुलै रोजी जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून (सीईटी कक्ष) देण्यात आली. दरम्यान राज्यभरात कृषी अभ्यासक्रमासाठी १७ हजार ७७६ जागा आहेत.

कृषी शिक्षणामध्ये बी.एसस्सी कृषी, बी.एसस्सी उद्यानविद्या, बी.एसस्सी वनविद्या, बी.एफएस्सी मत्स्यशास्त्र, बी.टेक अन्न तंत्रज्ञान, बी.टेक जैवतंत्रज्ञान, बी.टेक कृषी अभियांत्रिकी, बी.एसस्सी सामुदायिक विज्ञान, बी.एसस्सी कृषी व्यवसाय व्यवस्थापन अशा नऊ अभ्यासक्रमांना एमएचटी सीईटीच्या माध्यमातून प्रवेश दिले जातात. एमएचटी सीईटीच्या परीक्षेचा निकाल १६ जून रोजी जाहीर झाल्यानंतर प्रवेश प्रक्रियेसंदर्भातील सर्व प्रक्रिया पूर्ण करून ४ जुलैपासून प्रवेश प्रक्रियेला सुरूवात करण्यात येणार असल्याची माहिती सीईटी कक्षाचे आयुक्त दिलीप सरदेसाई यांनी दिली.

उपलब्ध जागांचा तपशील

२०२५-२६ या शैक्षणिक वर्षामध्ये कृषीच्या नऊ अभ्यासक्रमांसाठी राज्यामध्ये १७ हजार ७७६ जागा आहेत. यामध्ये शासकीय महाविद्यालयांमध्ये ३ हजार ६२६ जागा तर खासगी महाविद्यालयांमध्ये १४ हजार १५० इतक्या जागा आहेत. राज्यामध्ये बीएसस्सी कृषी अभ्यासक्रमासाठी १२ हजार १७८ जागा, उद्यानविद्या अभ्यासक्रमासाठी ११०४ जागा, बीटेक (कृषी अभियांत्रिकी) ८६४ जागा, बीटेक (अन्न तंत्रज्ञान) १४४०, बीटेक (जैवतंत्रज्ञान) १०४० जागा, कृषी व्यवसाय व्यवस्थापन ९४० जागा, बी.एसस्सी सामुदायिक विज्ञान ६० जागा, बी.एसस्सी वनविद्या ८२ जागा आणि बी.एसस्सी मत्स्य विज्ञान ४० जागा असल्याची माहिती कृषी विभागाचे परीक्षा समन्वयक डॉ. मंगेश निकम यांनी दिली.

प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक

  • ऑनलाईन प्रवेश अर्ज व कागदपत्रे अपलोड करणे – ४ ते १७ जुलै
  • अंतरिम गुणवत्ता यादी – २१ जुलै (सायंकाळी ५.३० नंतर)
  • हरकती नोंदविणे – २२ ते २४ जुलै
  • तक्रारींची यादी प्रसिद्ध – २५ जुलै (सायंकाळी ५.३० नंतर)
  • पहिल्या फेरीसाठी उपलब्ध जागांची प्रसिद्धी – २६ जुलै
  • प्राधान्यक्रम नोंदविणे – २७ व २८ जुलै
  • पहिली फेरी जाहीर – ३० जुलै (सायंकाळी ५.३० नंतर)
  • महाविद्यालयात प्रवेश घेणे – ३१ जुलै ते २ ऑगस्ट
  • दुसऱ्या फेरीसाठी जागांचा तपशील जाहीर – ३ ऑगस्ट (सकाळी ९ वाजता)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *