
मुंबई :
अल्प प्रतिसादामुळे बीबीए, बीसीए, बीबीएम आणि बीएमएस या अभ्यासक्रमाची घेण्यात येणारी अतिरिक्त सीईटी १९ जुलै रोजी होणार आहे. तसेच राष्ट्रीय अध्यापक शिक्षक परिषदेने (एनसीटीई) चार वर्षीय बीए/बीएसस्सी-बीएड (एकात्मिक) अभ्यासक्रम २०२५-२६ ऐवजी २०२६-२७ पासून बंद करण्याचा निर्णय घेतल्याने यंदाच्या प्रवेशासाठी विलंबाने अर्ज नोंदणी प्रक्रियेला सुरुवात केलेल्या या अभ्यासक्रमाची सीईटी २० जुलै रेाजी घेण्यात येणार असल्याचे राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून जाहीर करण्यात आले.
बीबीए, बीसीए, बीबीएम आणि बीएमएस अभ्यासक्रमांसाठी एक लाखांहून अधिक जागा उपलब्ध असून, यंदा घेण्यात आलेल्या सीईटी परीक्षेसाठी ७२ हजार २५९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यातील ६१ हजार ६६६ विद्यार्थी परीक्षेला उपस्थित होते. या अभ्यासक्रमाला अल्प प्रतिसाद मिळाल्याने मोठ्या प्रमाणात जागा रिक्त राहणार असल्याने उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून अतिरिक्त सीईटी घेण्याचा निर्णय घेण्यात आला. या परीक्षेसाठी २० जूनपर्यंत नव्याने राबविण्यात आलेल्या नोंदणी प्रक्रियेमध्ये ४० हजार ६५४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. या विद्यार्थ्यांची प्रवेश परीक्षा १९ जुलै रोजी घेण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे राष्ट्रीय अध्यापक शिक्षक परिषदेने चार वर्षीय बीए/बीएसस्सी-बीएड (एकात्मिक) अभ्यासक्रम २०२६-२७ पासून बंद करण्याचा निर्णय घेतल्याने उच्च व तंत्र शिक्षण विभागाने या अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया राबविण्याच्या सूचना सीईटी कक्षाला दिल्या होत्या. या अभ्यासक्रमासाठी राबविण्यात आलेल्या नोंदणी प्रक्रियेसाठी राज्यभरातून ९०५ विद्यार्थ्यांनी अर्ज नोंदणी केली आहे. या सर्व विद्यार्थ्यांची परीक्षा २० जुलै रोजी घेण्यात येणार असल्याचे राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून जाहीर करण्यात आले.
या परीक्षेपूर्वी सात दिवस अगोदर विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र त्यांच्या लॉगिन आयडीमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना परीक्षेची वेळ, परीक्षा केंद्र याची माहिती देण्यात येणार आहेत. तसेच विद्यार्थांनी दिलेल्या वेळेपूर्वी परीक्षा केंद्रावर उपस्थित राहावे असे आवाहन सीईटी कक्षाकडून करण्यात आले आहे.