शहर

ST : एसटी कर्मचाऱ्यांची २६०० कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कमेची वैधानिक देणी अद्यापी थकीत

सरकार निधी कधी देणार? – श्रीरंग बरगे यांचा सरकारला सवाल

मुंबई : 

एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी दर महिन्याला सरकारकडून निधी उपलब्ध करून दिला जातो. पण गेले अनेक महिने मागणी प्रमाणे आवश्यक निधी येत नसल्याने कर्मचाऱ्यांना नक्त वेतन देण्यात येत असून कर्मचाऱ्यांच्या वेतनातून कपात करण्यात आलेली साधारण २६०० कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कमेची वैधानिक देणी संबंधित संस्थाना भरली नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आल्याचे महाराष्ट्र एस टी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी म्हटले आहे.

महामंडळाची आर्थिक स्थिती एकदम बिकट असल्याचे श्वेत पत्रिका काढून महामंडळाने स्वतःच कबूल केले आहे.महामंडळचे एकूण उत्पन्न व खर्च याचा ताळमेळ बसत नसून सद्या कर्मचाऱ्यांना सरकारकडून देण्यात येणाऱ्या सवलत मूल्य प्रतिपूर्ती रक्कमेतून वेतन देण्यात येत आहे.पूर्ण वेतन देण्यासाठी साधारण ४८० कोटी रुपये इतकी रक्कम लागत असून सवलत मूल्य प्रतिपूर्ती रक्कम ३७० कोटी रुपये इतकी होत आहे.याचाच अर्थ साधारण १०० कोटी रुपये इतकी रक्कम एसटीला दर महिन्याला कर्मचाऱ्यांच्या वेतनाला अजूनही कमी पडत असल्याचे दिसून येत असून त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या वेतनातून कपात करण्यात आलेली वैधानिक देणी संबंधित संस्थाना भरलेली नाहीत.

वैधानिक देणी थकीत रक्कम

भविष्य निर्वाह निधी १२०० कोटी रुपये, उपादान १४०० कोटी रुपये, रजा रोखीकरण ६० कोटी रुपये, एसटी बँक २५ कोटी रुपये,व इतर वैधानिक देणी साधारण १०० कोटी रुपये, वरील सर्व रक्कमाची आकडेवारी पाहिल्यास कर्मचाऱ्यांच्या वेतनातून कपात करण्यात आलेली रक्कम संबंधित संस्थाना भरलेली नाही.कर्मचाऱ्यांच्या मेहनतीचा पैसा संबधित संस्थांना न भरणे हे चुकीचे असून श्वेत पत्रिका काढून आर्थिक स्थितीचा लेखा जोखा सर्वांसमोर जाहीर करण्याचा धाडसी निर्णय घेणारे राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एक वेळचा पर्याय म्हणून थकीत रक्कम भरण्यासाठी सरकारकडून निधी उपलब्ध घ्यावा अशी विनंती वजा मागणीही बरगे यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *