
मुंबई :
बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे नागरिकांसाठी ‘उपशामक काळजी’ अर्थात ‘पॅलिएटिव्ह केअर’ बाह्यरुग्ण विभाग सेवा सुरू करण्यात आली आहे. ‘पॅलिएटिव्ह केअर’ क्षेत्रात महानगरपालिकेच्या माध्यमातून पश्चिम उपनगरामध्ये सुरू करण्यात आलेली ही पहिलीच रुग्णसेवा आहे. कर्करोग, मधुमेह अशा असंसर्गजन्य आजारांबरोबरच इतर गंभीर किंवा दीर्घकालीन आजारांनी ग्रस्त प्रौढ रुग्णांसाठी ही विशेष सेवा सुरू करण्यात आली आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालय व डॉ. रु. न. कूपर रुग्णालयामध्ये ही सेवा सोमवार व गुरुवारी दुपारी १ ते ३ दरम्यान देण्यात येणार आहे.
पॅलिएटिव्ह केअर बाह्यरुग्ण विभागाचे लोकार्पण कूपर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर मेढेकर यांच्या उपस्थितीत झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून टोपीवाला राष्ट्रीय वैद्यकीय महाविद्यालय आणि बा. य. ल. नायर धर्मार्थ रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. शैलेश मोहिते, तसेच रोमिला पॅलिटिव्ह केअर आणि स्नेहा फाउंडेशनच्या संस्थापिका डॉ. आर्मिडा फर्नांडिस या उपस्थित होत्या.
डॉक्टर, परिचारिका आणि समुपदेशकांच्या समर्पित वैद्यकीय चमूतर्फे रुग्णांना उपशामक काळजी सेवा प्रदान केली जाईल. रुग्णालयातून सुटी मिळाल्यानंतर, या चमूतर्फे रुग्णांच्या घरी भेट दिली जाईल. दररोज सरासरी ५० रुग्णांना ही सेवा दिली जाईल. दीर्घकालीन आजार असलेल्या सरासरी ५ ते १० टक्के रुग्णांना तज्ज्ञ डॉक्टरांकडून नियमित वैद्यकीय सेवा दिली जाईल. ही संपूर्ण सेवा मोफत आहे. चमूमध्ये डॉक्टर, परिचारिका, समुपदेशक यांचा समावेश आहे. या उपचारपद्धतीद्वारे रुग्ण पूर्णतः वेदनामुक्त राहतील, याचे प्रयत्न केले जातात. रुग्णाच्या गरजेनुसार गृहभेटी दिल्या जातात.
हेही वाचा : ST : एसटी कर्मचाऱ्यांची २६०० कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कमेची वैधानिक देणी अद्यापी थकीत
रुग्णालयातील सामान्य औषध विभागाच्या प्रमुख डॉ. नीलम रेडकर आणि जनवैद्यकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. रवींद्र केंभवी यांनी आपल्या चमूसह रोमिला पॅलिटिव्ह केअर या स्वयंसेवी संस्थेच्या सहकार्याने ही सेवा सुलभ करण्यासाठी सहकार्य पुरवले आहे.
रुग्णांना भावनिक, सामाजिक आधार दिला जाणार
रुग्ण व त्यांची काळजी घेणारी व्यक्ती यांच्या समन्वयाने हा चमू कार्यरत राहील. कर्करोग, अर्धांगवायू, स्मृतिभ्रंश, पार्किन्सन्स, हृदयविकार, मूत्रपिंड, फुप्फुसाचे आजार इत्यादींबाबत आवश्यक ती काळजी या चमूकडून घेतली जाते. रुग्णांच्या वेदना व आजाराशी संबंधित लक्षणे कमी करणे, हे या सेवेचे प्रमुख उद्दिष्ट आहे. तसेच जखमांबाबतदेखील उपचार पद्धतीअंतर्गत विशेष काळजी घेतली जाते. या सेवेच्या माध्यमातून रुग्णांना भावनिक, सामाजिक व अध्यात्मिक आधारदेखील दिला जातो.
उपशामक सेवा मोफत दिली जाईल
पॅलिएटिव्ह केअर बाह्यरुग्ण विभागामध्ये दाखल झालेले रुग्ण किंवा इतर खासगी व सार्वजनिक रुग्णालये / दवाखान्यांमधून पाठवले गेलेले रुग्ण यांना ही उपशामक सेवा मोफत दिली जाईल. ज्या रुग्णांना उपशामक काळजी सेवेची गरज आहे, त्यांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालय व डॉ. रु. न. कूपर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर मेढेकर यांनी केले आहे.