
मुंबई :
छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर शनिवारी मुंबई सीमाशुल्क विभागाच्या झोन-III ने मोठ्या प्रमाणावर कारवाई करत तीन वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये अंमलीपदार्थ, वन्यजीव आणि सोन्याची एकूण ११ कोटी रुपयांहून अधिक किमतीची तस्करी उघडकीस आणली आहे. या कारवायांमध्ये चार जणांना अटक करण्यात आली आहे.
विशेष माहितीच्या आधारे सीमा शुल्क अधिकाऱ्यांनी बँकॉकहून आलेल्या एका भारतीय प्रवाशाला अडवले. त्याच्या सामानाची आणि वैयक्तिक झडती घेतल्यावर ९.६६२ किलो हायड्रोपोनिक गांजा आढळून आला. या अमलीपदार्थाची बाजारभावाने किंमत अंदाजे ९.६६२ कोटी रुपये आहे. ही चरस तपासणी दरम्यान चेक-इन सामानात हुशारीने लपवलेली होती. हे अंमलीपदार्थ एनडीपीएस कायदा, १९८५ अंतर्गत जप्त करण्यात आले असून संबंधित प्रवाशाला अटक करण्यात आली आहे.
एका वेगळ्या घटनेत, बँकॉकहून आलेल्या दुसऱ्या प्रवाशाच्या बॅगेची तपासणी दरम्यान सजीव आणि मृत अशा परदेशी वन्यप्राण्यांचे तुकडे जप्त करण्यात आले. यात एक जिवंत आणि तीन मृत रॅकून, तीन मृत ब्लॅक फॉक्स स्क्विरल तसेच एकूण ३७ ग्रीन इग्वाना यांचा समावेश आहे, त्यापैकी २९ जिवंत होते. प्राणी मूळचे भारतातील नसल्यामुळे त्यांच्या जीवितास धोका टाळण्यासाठी जिवंत प्राण्यांना त्यांच्या मूळ देशात परत पाठवण्याची व्यवस्था एअरलाईनच्या माध्यमातून करण्यात आली. या प्रकरणात सीमाशुल्क कायदा, १९६२ व वन्यजीव संरक्षण अधिनियम, १९७२ अंतर्गत गुन्हा नोंदवून प्रवाशाला अटक करण्यात आली आहे.
दुबईहून आलेल्या दोन प्रवाशांना अधिकाऱ्यांनी संशयावरून थांबवून तपासले असता त्यांच्या शरीरात व कपड्यांमध्ये लपवलेले २४ कॅरेट शुद्ध सोनं आढळून आलं. १.६५० किलो वजनाच्या या सोन्यात सोन्याच्या धुळीपासून ते मोहरांसारख्या तुकड्यांचा समावेश होता. या सोन्याची एकूण किंमत अंदाजे १.४९ कोटी रुपये आहे. दोन्ही प्रवाशांना सीमाशुल्क कायद्यानुसार अटक करण्यात आली आहे.