
मुंबई :
विद्या विकास एज्युकेशन सोसायटीच्या विकास कॉलेज ऑफ आर्ट्स, सायन्स अॅण्ड कॉमर्स, विक्रोळी येथे २०२३-२०२४ या शैक्षणिक वर्षातील पदवीधर विद्यार्थ्यांसाठी पदवी प्रमाणपत्र वितरण समारंभ अत्यंत उत्साहात संपन्न झाला.
या समारंभाच्या अध्यक्षस्थानी डॉ. अनघा राऊत (उपमुख्य कार्यकारी अधिकारी, विद्या विकास एज्युकेशन सोसायटी) होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून माजी प्राचार्य डॉ. आर. के. पात्रा यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. त्यांनी वेळेचा योग्य वापर, मोठी स्वप्न बघून ती प्रत्यक्षात आणणे आणि सतत अध्ययनाचे महत्व विषद केले. प्रभारी प्राचार्या डॉ. (सौ.) शुभदा के. देशपांडे यांनी समारंभाच्या संकल्पनेचे विवेचन करत विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
विशेष अतिथी म्हणून सचिन खामकर वरिष्ठ व्यवस्थापक सकाळ मिडिया प्रा. लि. व महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी यांनी विद्यार्थ्यांना उद्योगक्षेत्रातील सतत होणाऱ्या बदलांशी सुसंगत राहण्याचे आवाहन केले. महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी श्री. केतन थोरात (वरिष्ठ व्यव्स्थापक, एसीएसइ सोल्युशन्स यांनी कॉर्पोरेट क्षेत्रात सॉफ्ट स्किल्स म्हणजेच संवाद कौशल्य, टीमवर्क आणि भावनिक बुद्धिमत्ता यांचे वाढते महत्त्व विषद केले. सौ. शैला थोरात, एमआयएस ऑफिसर, दुबई फर्स्ट बँकेच्या माजी कर्मचारी व माजी विद्यार्थिनी) यांनी आत्मविश्वास व चिकाटीच्या जोरावर यशाचे शिखर गाठता येते, हे स्वतःच्या अनुभवातून सांगितले.
हेही वाचा : Chief Justice : चिकित्सक शाळेतील शिक्षकांमुळे मी घडलो – सरन्यायाधीश भूषण गवई
समारोपाच्या अध्यक्षीय भाषणात डॉ. अनघा राऊत यांनी विद्यार्थ्यांना वेळ आणि बुद्धीचा विचारपूर्वक व शहाणपणाने वापर करण्याचा सल्ला दिला. त्यांनी शिस्त, दूरदृष्टी आणि योग्य निर्णयक्षमतेच्या महत्त्वावर भर द्यावा असे नमूद केले. या प्रसंगी उपप्राचार्य प्रा. विनायक मुळे, प्रा. मॅथ्यू व सर्व प्राध्यापकवृंद उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी आनंदपूर्वक व अभिमानाने पदवी प्रमाणपत्रे स्वीकारली. प्रा. (सौ.) सी. विन्स यांनी आभारप्रदर्शन केले. हा समारंभ विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील एक स्मरणीय टप्पा ठरला. शिक्षण पूर्ण करून नव्या वाटचालीस निघालेल्या विद्यार्थ्यांसाठी हा एक गौरवशाली आणि प्रेरणादायी क्षण होता.